श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा घरच्या मैदानावरचा भरगच्च कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. बीसीसीआयच्या स्पर्धा निश्चीती समितीने कोलकाता येथे झालेल्या बैठकीत सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत भारतीय संघाचा घरच्या मैदानावरचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे वर्षाअखेरीस भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा हा २०१८ या नवीन वर्षात ढकलला जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या समितीने घरच्या मैदानावर निश्चीत केलेला कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल –

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ५ वन-डे आणि ३ टी-२०
स्पर्धेचा कालावधी – सप्टेंबर १७ ते ऑक्टोबर ११

भारत विरुद्ध न्यूझीलंड – ३ वन-डे आणि ३ टी-२०
स्पर्धेचा कालावधी – ऑक्टोबर २२ ते नोव्हेंबर ७

भारत विरुद्ध श्रीलंका – ३ कसोटी, ३ वन-डे आणि ३ टी-२०
स्पर्धेचा कालावधी – नोव्हेंबर १५ ते डिसेंबर २४

या मोठ्या दौऱ्यामध्ये भारतीय क्रीडारसिकांना दोन नवीन मैदानांवर सामना पहायची संधी मिळणार आहे. आसाममधील बारसपारा आणि त्रिवेंद्रम येथेली ग्रिनफील्ड आंतराष्ट्रीय मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धचा प्रत्येकी १-१ टी-२० सामना खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ५ वन-डे सामने हे चेन्नई, बंगळुरु, नागपूर, इंदौर आणि कोलकाता या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तर हैदराबाद, रांची आणि गुवाहटी येथे टी-२० सामने भरवले जातील. तर न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यातील ३ सामने हे पुणे, मुंबई आणि कानपूरच्या मैदानावर खेळवले जातील, आणि टी-२० सामन्यांची मालिका ही दिल्ली, कटक आणि राजकोट या मैदानावंर खेळवली जाणार आहे.

सध्या भारताचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यात भारत ३ कसोटी, ५ वन-डे आणि १ टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील गॉल कसोटीत भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. मात्र श्रीलंकेच्या भारत दौऱ्यात भारतीय संघ प्रत्येकी ३ कसोटी, वन-डे आणि टी-२० सामने खेळणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका ही कोलकाता, दिल्ली आणि नागपूर तर वन-डे सामन्यांची मालिका ही धर्मशाला, मोहाली आणि विझागच्या मैदानात खेळवली जाईल. तर टी-२० सामन्यांचा मान त्रिवेंद्रम, इंदौर आणि मुंबईतल्या मैदानांना मिळाला आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर आपल्या आगामी दौऱ्यासाठी तयारी करण्याला भारतीय खेळाडूंना फार कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे मायदेशात खेळवण्यात येणाऱ्या या मोठ्या आव्हानाचा भारतीय संघ कसा सामना करतोय हे पहावं लागणार आहे.