रवींद्र जडेजाला अपशब्द वापरून धक्काबुक्की करणाऱ्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची न्यायआयुक्त लुइस गॉर्डन यांनी निर्दोष मुक्तता केली होती. पण या ‘पूर्णपणे चुकीच्या’ निर्णयाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुनर्विचार करावा, अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली आहे.
या प्रकरणाची सुनावणी करताना गॉर्डन यांनी अँडरसन आणि जडेजा या दोघांनाही निर्दोष ठरवले होते, पण या सुनावणीचा अहवाल पडताळून पाहिल्यानंतर बीसीसीआयने या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला असल्याचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
‘‘आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्ड्सन यांना मी मंगळवारी रात्री पत्र लिहिले असून त्यामध्ये त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे. न्यायआयुक्तांच्या निकालाविरोधात आम्ही दाद मागू शकत नाही, पण आयसीसी ते करू शकते. येत्या ४८ तासांमध्ये याचा निकाल लागेल, असा मला विश्वास आहे,’’ असे पटेल यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘जडेजाला ढकलल्याचा कबुलीजबाब दिल्यानंतरही अँडरसन दोषी कसा काय ठरू शकत नाही. या प्रकरणी आयसीसीच्या आचारसंहितेच्या अनेक नियमांचा भंग केला गेला आहे.’’
आयसीसी अहवालाचा बारकाईने अभ्यास करणार
इंग्लंडचा जेम्स अँडरसन व भारताचा रवींद्र जडेजा यांच्यात झालेल्या वादाचा अहवाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) आला असून, या अहवालाचा आयसीसी बारकाईने अभ्यास करीत आहे. आयसीसीच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले की ‘‘या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेले न्यायआयुक्त गॉर्डन लुइस यांच्याकडून आमच्याकडे लेखी अहवाल आला आहे. या दोन्ही खेळाडूंनी आयसीसीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. या संदर्भात आम्हाला पुनर्विचार करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत आहे. जोपर्यंत या वादाबाबत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही.’’
लुइस यांच्या आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे अँडरसनला मोठा दिलासा मिळाला आहे. जर त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले असते, तर त्याच्यावर दोन कसोटी सामन्यांची बंदी घातली गेली असती. अँडरसनने जडेजाला ढकलले असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. जडेजावरही असेच आरोप ठेवण्यात आले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसीला या प्रकरणाचा बारकाईने पुनरावलोकन करावे अशी मागणी केली आहे.