भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ६ डिसेंबरपासून भारताची कसोटी मालिका सुरु होणार आहे. तत्पूर्वी बुधवारपासून भारतीय संघ क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाशी सराव सामना खेळणार होता. पण पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला. त्यामुळे सकाळी जिममधील व्यायाम झाल्यांनंतर BCCI ने ड्रेसिंग रूममध्ये भारताच्या काही निवडक खेळाडूंना प्रश्न विचारले आणि त्यावर खेळाडूंना भन्नाट उत्तरे दिली.

‘रॅपिड फायर’ पद्धतीने खेळाडूंना प्रश्न विचारण्यात आले. सर्वाधिक झोपाळू कोण? ठरलेले प्लॅन रद्द करणारा कोण? कायम भुकेलेला कोण असतो? सर्वात विसराळू कोण? सगळ्यात जास्त फोनवर व्यस्त कोण असतो? असे प्रश्न खेळाडूंना विचारण्यात आले. त्याची खेळाडूंनी भन्नाट उत्तरं दिली. हा व्हिडीओ BCCI ने ट्विट केला आहे.

दरम्यान, चार दिवसाच्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. आज दुसऱ्या दिवशी भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या. वरुणराजाने हजेरी लावत सामन्याचा पहिल्या दिवसा खेळ वाया घालवला. पहाटे साडे पाच वाजता हा सामना सुरू होणार होता, पण पावसाच्या हजेरीने सामना सुरुच झाला नाही. त्यामुळे भारताच्या सरावावर पाणी फेरले गेले. भारताकडून नवोदित पृथ्वी शॉ याने ६६, चेतेश्वर पुजाराने ५४, कोहलीने ६४, अजिंक्य रहाणेने ५८ आणि हनुमा विहारीने ५३ यांनी अर्धशतके झळकावली. अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ व्यतिरिक्त मुंबईकर रोहित शर्माने ४० धावांची खेळी केली. लोकेश राहुल पुन्हा एकदा आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. तो तीन धावांवर बाद झाला. यष्टीरक्षक पंत अवघ्या ११ धावांवर बाद झाला.