भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) दिला जाणारा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार अर्थात पॉली उम्रीगर पुरस्कार मंगळवारी विराट कोहलीला प्रदान करण्यात आला. कोहलीला २०१६-१७ आणि २०१७- १८ या दोन्ही वर्षांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कार मिळाला असून विराटला एकूण ३० लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात २०१६- १७ आणि २०१७- १८ वर्षांसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. यात विराट कोहलीला दोन्ही मोसमांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तर महिलांमध्ये हरमनप्रीत कौरला २०१६- १७ साठी आणि स्मृती मंधानाला २०१७- १८ या मोसमातील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. मंगळवारी बेंगळुरु येथील कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विराट कोहलीला रवी शास्त्री यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.

विराटने २०१६- १७ मध्ये १३ कसोटींमध्ये ७४ च्या सरासरीने १, ३३२ धावा तर २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८४.२२ च्या सरासरीने १, ५१६ धावा केल्या. तर २०१७- १८ या वर्षात विराटने ६ कसोटींमध्ये ८९ च्या सरासरीने ८९६ धावा चोपल्या. या कामगिरीसाठी त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

२०१६- १७ मधील पुरस्कारांचे मानकरी

रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू : परवेझ रसूल (जम्मू-काश्मीर)
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू : कृणाल पंड्या
रणजीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज: पी के पांचाळ (गुजरात)
रणजीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज: शाहबाज नदीम (झारखंड)
जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू) : पूनम राऊत

२०१७- १८ मधील पुरस्कारांचे मानकरी
रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू : जलज सक्सेना (केरळ)
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू : दिवेश पठाणी
रणजीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज: मयांक अग्रवाल (कर्नाटक)
रणजीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज: जलज सक्सेना (केरळ)
जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू) : दीप्ती शर्मा