दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा अखेरीस करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेला आहे. बीसीसीआय अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. सध्या भारतात करोना विषाणूचे अनेक रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर लखनऊ आणि कोलकाता वन-डे सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारच्या सामन्यासाठी भारतीय संघ लखनऊत दाखलही झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. त्यातला धर्मशाळा येखील पहिला वन-डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दरम्यान, श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या संघाने माघार घेण्याचं ठरवलं आहे. इंग्लंडचे सर्व खेळाडू तातडीने मायदेशी परतणार आहेत. इंग्लंड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून हा दौरा रद्द करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर दौऱ्याच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय. याचसोबत २९ मार्चपासून सुरु होत असलेली आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने पुढे ढकलली असून आता ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे.