03 March 2021

News Flash

दालमिया यांना अखेरचा निरोप

ईडन गार्डन्स स्टेडियमवर दालमिया यांचे पार्थिव दोन तासांकरिता ठेवण्यात आले होते.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. दालमिया यांनी केवळ क्रिकेट नव्हे तर राज्यातील अनेक क्रीडाप्रकारांमध्ये ज्येष्ठ संघटक म्हणून नावलौकिक मिळविला होता. त्यांच्या निधनाबद्दल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शासकीय दुखवटा जाहीर केला व त्यांच्यावर संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे जाहीर केले होते. यावेळी जगमोहन यांची पत्नी चंद्रलेखा, मुलगा अभिषेक आणि मुगली वैशाली हेदेखील उपस्थित होते.
एकेकाळचे प्रतिस्पर्धी असलेले शरद पवार व एन.श्रीनिवासन यांच्यासह अन्य संघटकांच्या उपस्थितीत व शासकीय इतमामात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने दालमिया यांचे निधन झाले होते.
ईडन गार्डन्स स्टेडियमवर दालमिया यांचे पार्थिव दोन तासांकरिता ठेवण्यात आले होते. त्या वेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर, माजी अध्यक्ष शरद पवार व शशांक मनोहर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवासन, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली, भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तेथून किओरतळा स्मशानभूमीपर्यंत दालमिया यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यामध्ये अनेक खेळाडू, संघटक, राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सहभागी झाले होते.

दालमिया यांचे नेत्रदान
सामाजिक जाण असलेल्या जगमोहन दालमिया यांनी आपले डोळे सुस्रूत आय फाऊंडेशन व रिसर्च सेंटरच्या वनमुक्त आय बँकेला दान केले आहेत. ‘‘अंधत्वाचे निर्मूलन, या समाज कल्याण कार्यक्रमाअंतर्गत डोळे दान करण्याचा निर्णय घेतला होता,’’ अशी माहिती बीसीसीआयने दिली.

श्रद्धांजली
दूरदृष्टी असलेला प्रशासक गमावला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जगमोहन दालमिया यांनी १९९७ ते २००० या कालावधीत आयसीसीचे अध्यक्षपद भूषविले होते. दालमिया यांना श्रद्धांजली अर्पण करताना आयसीसीचे कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन म्हणाले की, ‘‘क्रिकेटमधील त्यांच्या बहुमोल योगदानासाठी दालमिया दीर्घकाळ स्मरणात राहतील. त्यांच्या आकस्मिक निधनाने दु:ख झाले. ‘दूरदृष्टी असलेला प्रशासक’ अशी त्यांची ओळख होती आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य क्रिकेटला समर्पित केले होते. ते बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर असताना भारतीय क्रिकेटचीही भरभराट झाली. तसेच आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातही त्यांनी जागतिक संघटनेला मजबुती मिळवून दिली. प्रामाणिक, वचनबद्ध आणि समर्पित व्यक्ती क्रिकेटने गमावली आहे.’’
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनीही दालमिया यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, ‘‘क्रिकेटप्रति असलेल्या त्यांच्या समपर्णाचे कौतुक जगभरात केले जाते. ते खेळाडूंना आणि सहकाऱ्यांना सन्मान द्यायचे. ते आयसीसीच्या अध्यक्षपदावर असताना क्रिकेटने जागतिकीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीसी चॅम्पियन्स स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. त्यामधून मिळालेले उत्पन्न जगभरातील क्रिकेट विकासासाठी वापरण्यात आले. त्यांच्या या योगदानासाठी केवळ आभार मानणे पुरेसे नाही. आयसीसीच्या वतीने दालमिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’’

क्रिकेटने सर्वोत्तम प्रशासक गमावला, ज्याने भारताला क्रिकेटची पंढरी बनवली. मी एक चांगला मित्र गमावला. गेल्या महिन्यातच कोलकाता येथे त्यांच्याशी शेवटची भेट झाली होती. आजारातून बरा होण्याची आशा त्यांना होती. मात्र, नियतीने काही वेगळेच लिहिले होते.
-अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

जगमोहन दालमिया यांच्या जाण्याने खूप दु:ख होत आहे. आशियाई देशातून पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदावर विराजमान होणारे दालमिया, याच गोष्टीसाठी स्मरणात राहतील.
-शरद पवार, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष

जगमोहन दालमिया यांच्या त्या हसऱ्या चेहऱ्याची आठवण कायम येईल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांनी आयएस बिंद्रा यांच्यासह भारतीय क्रिकेटची क्षमता ओळखली आणि त्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलली. दालमियांच्या मार्गदर्शनाखाली काही हजार डॉलर असलेल्या आयसीसीचा संसार दशलक्ष डॉलपर्यंत पोहचला.
-सुनील गावसकर, माजी कसोटीपटू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 4:39 am

Web Title: bcci chief jagmohan dalmiya final journey begins
टॅग : Jagmohan Dalmiya
Next Stories
1 ला लीग फुटबॉल स्पर्धा : मेस्सीचा दुहेरी धमाका, बार्सिलोना आघाडीवर
2 बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी शर्यत सुरू
3 BLOG : भंगू दे काठीण्य स्टंपाचे
Just Now!
X