नवी दिल्ली : करोनामुळे देशांतर्गत क्रिकेटचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्यापही रणजी करंडक स्पर्धेच्या आयोजनाची आशा बाळगली आहे. अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत रणजी करंडकाच्या आयोजनासाठी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने भक्कम पाठिंबा दर्शवला.

जैवसुरक्षित वातावरणात १० ते ३१ जानेवारीदरम्यान होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे वेळापत्रक ‘बीसीसीआय’ने अलीकडेच जाहीर केले. या स्पर्धेच्या आयोजनानंतरच आढावा घेऊन अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. रणजी स्पर्धेच्या आयोजनासाठी ‘बीसीसीआय’ तसेच सर्व संलग्न राज्य संघटनांनी अन्य पर्याय तयार ठेवावेत, असे निर्देश गांगुलीने दिले आहेत. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेनंतर विजय हजारे करंडक तसेच रणजी करंडक स्पर्धा खेळवण्याविषयी गांगुली आग्रही आहे.

करोनाबाबतची देशातील परिस्थिती सुधारल्यास, रणजी करंडक स्पर्धा आयोजित करण्यासाठी गांगुली आग्रही आहे. त्यासाठी सर्व राज्य संघटनांना कामाला लागा, असे आदेशही त्याने दिले आहेत.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी ठिकाणे निश्चित

पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आतापासूनच तयारी केली आहे. सामन्यांच्या आयोजनासाठी काही शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात अहमदाबाद, बेंगळूरु, चेन्नई, दिल्ली, मोहाली, धरमशाला, कोलकाता आणि मुंबई ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात रंगणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत