काही वर्षांपूर्वी गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार दर्शवणाऱ्या भारतीय संघाने अखेरीस आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. कोलकात्यातील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध, पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळत एका डावाने विजयही मिळवला. नव्याने बीसीसीआयची सूत्र हाती घेतलेल्या सौरव गांगुलीने यासाठी पुढाकार घेतला. भारतीय संघाने आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळल्यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड देखील भारतीय संघासोबत दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची मागणी करत आहे.

अवश्य वाचा –  मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे, मी विश्वचषकाची काळजी करत नाही – लोकेश राहुल

२०२० साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी जाणार आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच थांबेल, कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी आणि ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघ भारतीय संघाने ४ पैकी २ कसोटी सामने हे दिवस-रात्र प्रकारात खेळावेत यासाठी प्रयत्नशील आहे. यावर उत्तर देताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

“चार पैकी दोन कसोटी सामने दिवस-रात्र पद्धतीने खेळायचे हे जरा अतिच झालं. आम्हाला याबद्दल ठरवावं लागेल. मी देखील वृत्तपत्रांमध्ये याबद्दल वाचलं, पण ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून मला याबद्दल अधिकृत काहीही समजलं नाहीये. ज्यावेळी त्यांच्याकडून अशी अधिकृत मागणी होईल त्यावेळी याच्यावर विचार केला जाईल.” India Today वाहिनीशी बोलत असताना सौरव गांगुलीने बीसीसीआयची भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेनंतर खुद्द सौरव गांगुलीही भारतीय संघाने अधिकाधिक दिवस-रात्र कसोटी सामने खेळावेत यासाठी आग्रही आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू करतोय संघात पुनरागमनासाठी प्रयत्न