इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमार याला भारतीय संघात स्थान देण्याच्या निर्णयावरून BCCI आणि Team Indiaचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमारला खेळवूनही भारताला सामना आणि मालिका गमवावी लागली. त्यामुळे आता त्याच्या परिणामांना संघ व्यवस्थापनाला सामोरे जावे लागत आहे.

या सामन्याआधी मालिका १-१ अशी बरोबरीत होती. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक ठरणार होता. अशा वेळी अर्धवट तंदुरुस्त असलेल्या भुवनेश्वर कुमारला संघात घेण्याचे प्रयोजन काय? असा सवाल सर्व स्तरातून उपस्थित होत होता. याबाबत आता BCCI आणि रवी शास्त्री यांच्यात जुंपल्याचे दिसत आहे.

भुवनेश्वर कुमारला अंतिम सामन्यात का समाविष्ट करण्यात आले? असा सवाल जेव्हा विचारला गेला तेव्हा ‘हा प्रश्न तुम्ही जाऊन प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विचारा’, असे संतप्त उत्तर बीसीसीआयसीच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आले. अधिकारी पुढे म्हणाला की भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त आहे असे ज्यावेळी सांगण्यात आले, तेव्हा तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही, हे गृहीत धरले होते. पण त्याला तरीही खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. जर कसोटी संघात त्याला समाविष्ट करून घायचे असेल, तर एकदिवसीय सामन्यात त्याला अर्धवट तंदुरुस्त अवस्थेत त्याला खेळवण्याचा अट्टहास का? असाही सवाल या अधिकाऱ्याने केला.