ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सध्या विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ अशी रंगात आलेली पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने विराट कोहलीला लक्ष्य केले, तर तेथील माध्यमांनीही कोहलीवर निशाणा साधला. यासंपूर्ण प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) विराट कोहलीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले नाही, असा आरोप बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर यांनी यावेळी बीसीसीआयवर हल्लाबोल केला.

 

बंगळुरू कसोटीतील डीआरएस प्रकरणावरून सुरू झालेल्या वादात कोहलीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथवर खोटे आरोप केल्याचे म्हटले गेले. याच मुद्द्यावरून ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी विराट कोहलीला क्रीडा जगतातील डोनाल्ड ट्रम्प असे संबोधून त्याची खिल्ली उडवली. कोहलीला लक्ष्य केले जात असताना बीसीसीआयने त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित होते, पण तशी भूमिकाच बीसीसीआयने घेतलेली दिसत नाही असे अनुराग ठाकूर यांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या कृतीवर ठाकूर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर नाराजी देखील व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱयांनी कोहलीच्या विरोधात केलेले कृत्य लज्जास्पद आहे, असे ट्विट अनुराग ठाकूर यांनी केले आहे. बीसीसीआयनेही भारतीय संघाच्या कर्णधाराच्या प्रामाणिकपणाची तडजोड केली आणि त्याच्या पाठिशी खंभीरपणे कोणीच उभे राहिले नाही. संघाच्या कर्णधाराच्या पाठिशी उभे न राहणे ही बीसीसीआयची चूक आहे. तर क्रिकेटमध्ये नियमांचा भंग करून नेहमी प्रतिस्पर्धी खेळाडूंना लक्ष्य करण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाची वृत्ती देखील माफ करण्यासारखी नाही, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.