आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील दोन खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. शनिवारी बीसीसीआयनेही या वृत्ताला दुजोरा देत खेळाडूंच्या तब्येतीकडे आयपीएलची मेडीकल टीम लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं. याचसोबत स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर प्रादूर्भाव होऊ नये यासाठी अधिक कडक नियम अमलात आणले जाणार असल्याचंही बीसीसीआयने स्पष्ट केलंय.

अवश्य वाचा – CSK च्या चेन्नईमधील ‘त्या’ कँपवर बीसीसीआय होतं नाराज?? आयोजन रद्द करण्याची केली होती विनंती

“युएईत दाखल झाल्यानंतर आयपीएलमध्ये सहभाही होणाऱ्या प्रत्येकाने क्वारंटाइन कालावधी आणि करोना चाचणी करवुन घेतली. २० ते २८ ऑगस्टदरम्यान आठही संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापनातील सदस्य, बीसीसीआयचे अधिकारी, खेळाडूंसोबत आलेला परिवार असं मिळून १९८८ RT-PCR COVID चाचण्या करण्यात आल्या. ज्यात १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यामध्ये दोन खेळाडूंचाही समावेश आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी घेतली जात असून सध्यातरी कोणामध्ये लक्षण आढळून आलेली नाहीत. आयपीएलची मेडीकल टीम सर्वांवर नजर ठेवून आहे.” बीसीसीआयने पत्रक जाहीर करत माहिती दिली आहे.

याचसोबत स्पर्धेदरम्यानही खेळाडूंच्या नियमाप्रमाणे करोना चाचण्या होत राहतील असंही बीसीसीआयने स्पष्ट केलंय. दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईचे इतर खेळाडूही खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाइन झालेले आहेत. १ सप्टेंबरनंतर चेन्नईच्या खेळाडूंना सरावाची परवानगी मिळणार आहे. याच कारणामुळे बीसीसीआयने अद्याप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Viral Video : CSK च्या खेळाडूंकडून BCCI नियमांचा भंग?? सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा…