दुखापतग्रस्त रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. दुखापतीचं कारण देऊन सुनिल जोशी यांच्या निवड समितीने रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान दिलं नाही. मात्र त्यानंतर रोहित सरावासाठी मैदानात उतरल्यामुळे संभ्रम वाढला. यानंतर NCA मध्ये फिटनेस सुधारण्याकडे लक्ष देत असलेल्या रोहितच्या उपलब्धतेबद्दल काहीच माहिती मिळालेली नसल्याचं विराटने जाहीरपणे सांगितल्यामुळे BCCI बॅकफूटला गेलं होतं. अखेरीस रोहित शर्माच्या दुखापतीबद्दल कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना माहिती देण्यात आली आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार कोहली, शास्त्री, NCA चे अधिकारी, निवड समितीचे प्रमुख सुनिल जोशी आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये एक कॉन्फरन्स कॉल झाला. या कॉलमध्ये ११ डिसेंबरला रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाल्यानंतर त्याच्या सहभागाबद्दल निर्णय घेतला जाईल असं ठरलं आहे. परंतू या कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा – BLOG : काहीतरी गंडलंय हे नक्की फक्त विराटने ते मान्य करायला हवं !

कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना संपल्यानंतर भारतात परतणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचं भारतीय कसोटी संघात असणं गरजेचं मानलं जात आहे. त्यातच पहिल्या दोन वन-डे सामन्यांत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यांत भारतीय संघाला रोहित शर्माची उणीव भासली.

अवश्य वाचा – निव्वळ वेडेपणा ! विराटच्या ‘त्या’ निर्णयावर माजी भारतीय गोलंदाजाची टीका