आगामी वर्षांमध्ये १४०वरून ८० दिवस खेळण्याची तयारी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या भरगच्च कार्यक्रमामुळे विश्रांती करायला उसंत मिळत नसल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने आगामी २०१९ ते २०२३ या वर्षांमध्ये १४०वरून ८० दिवस क्रिकेट खेळण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी यापुढे अतिक्रिकेट खेळवले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. यापूर्वी वर्षांला एक क्रिकेटपटू १४० दिवस क्रिकेट खेळत होता. त्याचबरोबर सामन्यांच्या तयारीसाठीही काही दिवस लागायचे, काही सराव सामनेही खेळले जायचे. आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याचा विचार केला तर अति क्रिकेटमुळे खेळाडूंना तयारी करण्यासाठी फार कमी वेळ मिळत आहे. भरगच्च क्रिकेटच्या कार्यक्रमामुळे भारतीय संघाला सराव सामनाही खेळायला मिळणार नाही, त्यामुळेच प्रशासकीय समितीने २०१९ ते २०२३ या वर्षांसाठी ८० दिवस क्रिकेट खेळवण्याचे ठरवले आहे.

उत्पन्नासाठी खेळाडूंची हानी करणार नाही राय

सध्याच्या घडीला भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. हे भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण दिवस आहेत. उत्पन्न मिळवणे हे बीसीसीआयचे मुख्य ध्येय नाही. आमच्यासाठी खेळाडू महत्त्वाचे आहेत, त्यामुळे उत्पन्नासाठी आम्ही खेळाडूंची हानी होऊ देणार नाही, असे राय यांनी सांगितले.

भारत-पाकिस्तान मालिकेचा विचार

आगामी २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिकेचा विचार प्रशासकीय समितीने केला आहे. याबाबत राय म्हणाले की, ‘आगामी काही वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेचा विचार आम्ही केला आहे, पण हा फक्त विचारच आहे. कारण केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच ही मालिका खेळवली जाऊ शकते. सरकारने या मालिकेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आम्ही ही मालिका खेळवण्यासाठी प्रयत्न करू, पण सरकारच्या परवानगीशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही.’