भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) भारतीय खेळाडूंवर आपला एक हाती अधिकार दाखवायला सुरूवात केली आहे. मुनाफ पटेल बीसीसीआयच्या अधिकारवाणीचा पहिला बळी ठरला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना यापुढे आयपीएलसोडून कोणत्याही जागतीक टी-२० सामन्यांमध्ये खेळू न देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या महिन्याच्या शेवटी सुरू होणारया इंग्लिश टी-२० स्पर्धेत खेळण्याचे निमंत्रण मिळालेल्या मुनाफ पटेलला बीसीसीआयने रेड सिग्नल दाखवत परवानगी नाकारली आहे.
आयपीएलच्या सहाव्या सत्रामध्ये विजेत्या मुंबई इंडियन्स कडून खेळलेल्या मुनाफला लॅंकशायर कडून खेळण्याचे निमंत्रण आले होते. त्यासाठी मंडळाकडे त्याने नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता.
“पटेलने बीसीसीआयकडे लॅंकशायर कडून खेळण्याची परवानगी मागणारा अर्ज केला होता. मात्र, त्याचा करार फक्त टी-२० सामन्यांसाठीच असल्यामुळे आम्ही त्याला परवानगी नाकारली. आमची भूमिका ठाम असून यापुढे भारताव्यतिरिक्त कोणत्याही टी-२० स्पर्धांमध्ये आमच्या खेळाडूंना खेळता येणार नाही. मात्र, जास्त षटकांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी मंडळाची काही हरकत नाही.,” असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकारयाने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
दरम्यान, बीसीसीआयने कॅरिबीयन प्रिमियर लीग(सीपीएल) मध्ये भारतीय खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी या सीपीएलच्या विनंतीला देखील नकार कळवला आहे. मात्र, इतर देशांनी त्यांच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यास कोणतीही हरकत घेतलेली नाही. मागील वर्षी श्रीलंकेत झालेल्या   
टी-२०, श्रीलंकन प्रिमियर लीग पासून बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम आहे.