भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार याबद्दल अद्यापही संभ्रम कायम आहे. काही वेळापूर्वी एएनआय आणि काही वृत्तसंस्थांनी रवी शास्त्रींची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या वृत्ताला दुजोरा दिला नाहीये. बीसीसीआयने अद्यापही प्रशिक्षकपदावर निर्णय घेतला नसल्याचं चौधरी यांनी म्हणलंय. अद्यापही बीसीसीआय नवीन प्रशिक्षकांच्या निवडीबद्दल चर्चा करत असल्याचं चौधरी म्हणाले.

काल मुंबईत क्रिकेट सल्लागार समितीेने प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या. यात ५ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्यानंतर सर्वप्रथम टॉम मूडी आणि विरेंद्र सेहवाग यांची नाव चर्चेत आली. मात्र कर्णधार कोहलीचा रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदासाठी पाठींबा होता, त्यामुळे शास्त्री भारताचे नवीन प्रशिक्षक होणार असं मानलं जातं होतं. त्यानुसार काही वेळापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेने शास्त्रींच्या निवडीची बातमी दिली. मात्र बीसीसीआयने याला अद्यापही दुजोरा दिला नाहीीये.

काल पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेनंतर क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकाचं नाव जाहीर करायला वेळ घेईल असं, सौरव गांगुली याने म्हणलं होतं.मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने बीसीसीआयला आजच प्रशिक्षकांचं नाव जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अनेक ठिकाणी शास्त्री यांच्या निवडीच्या बातम्या पुढे आल्या होत्या. पण बीसीसीआयने त्याला अद्यापही दुजोरा दिलेला नाहीये.

काल मुंबईत पार पडलेल्या प्रक्रियेत विरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, टॉम मूडी, रिचर्ड पायबस आणि लालचंद राजपूत यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यात सेहवाग हा एकटा उमेदवार सल्लागार समितीसमोर हजर राहिला होता. बाकीच्या सर्व उमेदवारांनी स्काईपद्वारे आपल्या मुलाखती दिल्या होत्या. मुलाखत प्रक्रिया पार पडल्यानंतर सेहवागने दिलेलं प्रेझेंटेशन हे सर्वात उजवं असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर सेहवाग आणि टॉम मूडी यांची नाव चर्चेत आली. त्यामुळे ऐनवेळी शास्त्री यांचं नाव मागे पडतं की काय अशा चर्चांनाही उधाण आलं होतं.

मागच्या वर्षी मुलाखतीदरम्यान शास्त्री आणि गांगुली यांच्यातले वाद आणि त्यानंतर कोहली-कुंबळेमधला बेबनाव यामुळे बीसीसीआयने ‘आस्ते कदम’ धोरण अवलंबलं आहे. सर्व खेळाडू आणि कर्णधाराशी चर्चा केल्यानंतरच नवीन नावाची घोषणा केली जाईल असं काल स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार वेस्ट इंडिजप्रमाणे भारताचा श्रीलंका दौराही प्रशिक्षकविना होण्याची चिन्ह होती. कारण कोहली आणि कुंबळे यांच्यातल्या वादामुळे बीसीसीआयची प्रतिमा डागाळली होती. हा संभावीत वाद टाळण्यासाठीच बीसीसीआय अद्यापही प्रशिक्षकपदाचं नाव जाहीर करत नसल्याचं समजतंय. त्यामुळे टीम इंडियाचे प्रशिक्षक नेमके कोण बनणार हे पाहणं आता खरच औत्सुक्याचं ठरणार आहे.