भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या प्रस्तावित दिवस-रात्र (डे-नाइट) कसोटी सामन्यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीमध्ये वाद निर्माण झाला आहे.

या सामन्यासाठी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अनुकूलता दर्शवली आहे. परंतु त्यासाठी आखलेल्या योजनांबाबत अंधारात ठेवले, अशी तक्रार प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी केली आहे. क्रिकेट मुख्यालयामध्ये बसून चार व्यक्ती महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

राय यांना बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी, मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक (क्रिकेट प्रशासन) साबा करीम तसेच आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन या चौकडीला लक्ष्य करायचे होते. मात्र त्यांनी नाव न घेता आपली भूमिका मांडली. अमिताभ, जोहरी आणि करीम हे दिवस-रात्र कसोटीबाबत शास्त्री यांच्या कायम संपर्कात आहेत. शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘वेस्ट इंडिजसारख्या दुय्यम दर्जाच्या संघासमोर दिवस-रात्र सामन्यातील एका सत्रामध्ये दवाची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.’’

विनोद राय यांचा आक्षेप योग्य असल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना वाटते. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांना विश्वासात घेण्याची गरज होती. मात्र अमिताभ आणि राहुल यांनी तसे केले नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.