पृथ्वी शॉच्या डोपिंग टेस्ट प्रकरणात, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयला पुन्हा एकदा फटकारले आहे. “बीसीसीआयला, ‘नाडा’च्या नियमाअंतर्गतच काम करावं लागेल, तुम्हाला नाही म्हणण्याचा अधिकारच नाहीये. प्रत्येक क्रीडा संस्थांसाठी एकच नियम बनवण्यात आला आहे आणि सर्वांना तो पाळावाच लागेल.” केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे सचिव आर.एस.जुलानिया यांनी क्रीडा मंत्रालयाची बाजू स्पष्ट केली आहे.

भारताचा कसोटीपटू पृथ्वी शॉ उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे, बीसीसीआयने त्याच्यावर ८ महिन्यांच्या बंदीची कारवाई केली होती. मात्र बीसीसीआयला डोपिंगचे अधिकारच नसल्याचं म्हणत केंद्रीय क्रीडामंत्रालयाने बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांना पत्र लिहून खडसावलं होतं. बीसीसीआय घेत असलेल्या डोपिंग टेस्टला भारत सरकारची संस्था ‘नाडा’ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था ‘वाडा’ यांची परवानगी नाहीये.

राष्ट्रीय डोपिंग संस्थेशी (नाडा) निगडित नसल्यामुळे बीसीसीआय आणि सरकारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. देशातील इतर खेळातील खेळाडू नाडासोबत जोडले आहेत पण बीसीसीआय या अंतर्गत येत नाही. बीसीसीआयच्या मते नाडाच्या नियमांत अनेक उणिवा आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे नियम पाळत नाही. त्याचप्रमाणे बीसीसीआय सरकारच्या आर्थिक मदतीनुसार चालणारी संस्था नाही. त्यामुळे आम्ही नाडाच्या अंतर्गत येत नाही, असं बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेवर बीसीसीआय काय पाऊल उचलतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.