सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयवर नियुक्त करण्यात आलेले लोकपाल जस्टीस डी.के.जैन यांनी सचिन तेंडुलकरवर ठेवण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचा निर्वाळा दिला आहे. सचिन तेंडुलकर बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आहे. या समितीकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत. आयपीएलमध्येही सचिन मुंबई इंडियन्स संघाचा ICON म्हणून काम करतो. मात्र बीसीसीआयच्या नियमानुसार, संघटनेमध्ये पद भूषवत असलेला कोणताही अधिकारी आयपीएलमध्ये काम करु शकत नाही. याच मुद्द्यावरुन सचिनविरोधात बीसीसीआयच्या लोकपालांकडे तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीवरुन सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना जस्टीस जैन यांच्यासमोर हजर राहुन आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी सचिनने आपल्याला मुंबई इंडियन्सकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ होत नसल्याचं सांगितलं. याचसोबत आपलं काम हे फक्त सल्ला देण्याचं असून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग नसल्याचंही सचिनने स्पष्ट केलं होतं. या प्रकरणानंतर जोपर्यंत नियमांमध्ये स्पष्टता येत नाही, तोपर्यंत क्रिकेट सल्लागार समितीचं काम पाहणार नाही अशी भूमिका सचिनकडून घेण्यात आली. यानंतर जैन यांनी तात्काळ पावलं उचलत सचिनविरोधातल्या तक्रारीत कोणत्याही प्रकारचा अर्थ नसल्याचं सांगत त्याची सर्व आरोपांमधून मुक्तता केली आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी या प्रकरणात बीसीसीआयकडे तक्रार केली होती. यानंतर सचिन आणि लक्ष्मण यांनी आपली बाजू जैन यांच्यासमोर मांडली. सचिनने आपल्या वकिलांच्या सल्ल्याने, बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीसाठीच्या नियमांमध्ये स्पष्टता आणण्याचं आवाहन केलं होतं. तोपर्यंत आपण सल्लागार समितीचं काम पाहणार नाही असंही सचिनने स्पष्ट केलं. यानंतर अखेरीस सचिनविरोधातील तक्रार निकालात काढण्यात आली आहे.