भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. BCCI ने प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार ४५ दिवसांनी वाढवला आहे. रवी शास्त्री यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनाही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. २०१७ साली रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ विश्वचषकापर्यंत त्यांचा करार करण्यात आला होता. मात्र भारतीय संघाचं विश्वचषकानंतरचं व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता शास्त्री आणि त्यांच्या टीमला मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

अवश्य वाचा – कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघासमोर सलामीलाच वेस्ट इंडिजचं आव्हान

बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने हा निर्णय घेतला आहे. रवी शास्त्री यांच्यासोबत सहायक प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर विश्वचषकानंतर विंडीज दौऱ्यामध्ये भारतीय संघासोबत असणार आहे. विश्वचषकानंतर १५ दिवसांनी भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत आपल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला सामना खेळेल.