ऑस्ट्रेलियात प्रस्तावित असलेल्या यंदाच्या T20 World Cup विश्वचषक स्पर्धेबाबत ICCकडून अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. ICC ने सदस्यांची दोन वेळा बैठक बोलावली, पण त्या बैठकीत याबाबत निर्णय घेणं शक्य झालं नाही. T20 विश्वचषकाच्या आयोजनाच्या निर्णयावर IPL 2020 चं आयोजन अवलंबून आहे. पण ICC कडून विश्वचषकाबाबतच्या निर्णयाला उशीर होत आहे, त्यामुळे आता BCCI बाकीच्या गोष्टींचा विचार न करता स्वत:चा उर्वरित वर्षाचा कार्यक्रम तयार करेल, असा इशारा BCCI चे खजिनदार अरूण धुमाळ यांनी दिला आहे.

“यंदाच्या वर्षाची सुरूवातच क्रीडा विश्वासाठी भयावह होती. कोणत्याही क्रीडा प्रकाराची यातून सुटका झाली नाही. पण आता मात्र आपल्याला येणाऱ्या काळासाठी तयार राहणं गरजेचं आहे. इतर खेळांप्रमाणेच क्रिकेटदेखील आता हळूहळू सुरू करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच BCCI आता उर्वरित वर्षासाठीचा कार्यक्रम तयार करणार आहे. T20 World Cup बाबत ICC काय निर्णय घेईल हे आपल्या हातात नाही. सध्या असं गृहित धरू या की विश्वचषक लांबणीवर टाकण्यात आला आहे, तर मग त्याची घोषणा जेव्हा व्हायची असेल तेव्हा होऊ द्या. पण आता बास झालं. BCCI आपल्या पद्धतीने उर्वरित वर्षाची आखणी करणार आहे”, असे धुमाळ म्हणाले.

“बास्केटबॉल स्पर्धा अमेरिकेत लवकरच सुरू होत आहेत. EPL, FA कप, बंडसलिगा या फुटबॉल स्पर्धांना सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियात स्थानिक रग्बीसुद्धा सुरू होणार आहे. असं सगळं भोवताली सुरू आहे. आणि BCCI काय करतंय? योजनांची आणखी करणं आता गरजेचं आहे. सप्टेंबरपासून किमान स्थानिक क्रिकेट सुरू होणं आवश्यक आहे”, असेही त्यांनी सांगितले.