बासीसीआयचे माजी जनरल मॅनेजर आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे महत्वाचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या एम. व्ही. श्रीधर यांचं आज निधन झालं. ते ५१ वर्षांचे होते. आपल्या राहत्या घरी श्रीधर यांना हृदयविकाराचा झटका आला, यानंतर श्रीधर यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं; मात्र तोपर्यंत श्रीधर यांनी अखेरचा श्वास घेतला होता. श्रीधर यांच्यामागे त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादातून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

१९८८ ते २००० या काळात श्रीधर यांनी हैदराबाद क्रिकेटचं प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत श्रीधर यांनी ६७०१ धावा काढल्या असून यात २१ शतकांचा समावेश आहे. आपल्या मैदानातील कारकिर्दीतीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये विविध पदांवर काम केलं. भारताच्या २००७-०८ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात श्रीधर यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिलं होतं. श्रीधर यांच्या निधनावर क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.