News Flash

भारतीय महिला संघाने सहा गुण गमावले

पाकिस्तानविरुद्ध तीन सामने न खेळल्याबद्दल आयसीसीची कारवाई

| November 24, 2016 03:11 am

पाकिस्तानविरुद्ध तीन सामने न खेळल्याबद्दल आयसीसीची कारवाई; बीसीसीआयची नाराजी

पाकिस्तानविरुद्ध न खेळल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निर्णयामुळे सहा मानांकन गुणांवर पाणी सोडावे लागले आहे. त्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आयसीसी महिला अजिंक्यपद क्रिकेट स्पध्रेचे सामने १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत झाले. आयसीसीच्या नियमानुसार भारत व पाकिस्तान यांच्यात तीन सामने होणार होते. परंतु भारताने पाकिस्तानबरोबरचा सामना खेळला नाही, या कारणास्तव भारताचे सहा गुण कमी करण्यात आले. याबाबत नाराजी प्रकट करताना बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘आयसीसीच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर ही भारतीय व्यक्तीच आहे. सध्या पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर सातत्याने दहशतवादी हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळण्यासाठी देशातील सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, हे त्यांना माहीत आहे, तरीही त्यांनी भारतीय महिला संघावर कारवाई केली हे चुकीचे आहे. महिला संघाला वेठीस धरले जात असेल तर आगामी चॅम्पियन्स स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानबरोबर सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘जर महिला संघाने पाकिस्तानशी सामना खेळला तर पाकिस्तानला आयतेच कोलीत मिळेल. महिला संघ आमच्याशी सामना खेळतो तर पुरुष खेळाडूंनी खेळायला काय हरकत आहे, असा प्रश्नही पाकिस्तानकडून निर्माण केला जाण्याची शक्यता आहे. आमचे पुरुष व महिला हे दोन्ही संघ चॅम्पियन्स स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालतील.’’

मनोहर यांच्याकडे आयसीसीचे अध्यक्षपद आल्यानंतर मनोहर यांच्याबरोबरच बीसीसीआयचे अनेक मुद्दय़ांवरून मतभेद निर्माण झाले आहेत.

 

आशियाई स्पध्रेतील भारत-पाक लढतीवर अनिश्चिततेचे सावट

नवी दिल्ली : बँकॉक येथे २९ नोव्हेंबरला भारतीय महिला संघ पाकिस्तानशी आशिया चषक क्रिकेट स्पध्रेचा सामना खेळणार होता. मात्र आशियाई क्रिकेट परिषदेच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पध्रेत पाकिस्तानशी खेळण्याची परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देईल का, याबाबत अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

सहा राष्ट्रांचा समावेश असलेली महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धा २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. आयसीसी विश्व अजिंक्यपद स्पध्रेसंदर्भातील पाकिस्तानशी तीन लढती न खेळल्यामुळे भारताने आधीच सहा गुण गमावले आहेत. सीमेवरील तणावग्रस्त परिस्थिती कायम असताना पाकिस्तानशी क्रिकेट संबंध जोडणे कठीण असल्यामुळे सध्या क्रिकेट सामन्यांपुढे अनिश्चितता पसरली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना आता याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

नवी दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर भारतीय महिला संघ पाकिस्तानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील तो सामना साना मिरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ जिंकला होता. येत्या काही दिवसांत भारतीय महिला संघ बँकॉकला रवाना होणार आहे. या स्पध्रेतील सर्व सामने टेर्डथाय क्रिकेट मैदानावर होणार आहेत. या स्पध्रेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि थायलंड या संघांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 3:11 am

Web Title: bcci furious as icc docks eves for not playing pakistan series
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाचे गुलाबी दिवस परतणार?
2 अनुपमचा पराक्रम
3 सायना विजयी
Just Now!
X