गेले काही दिवस अधिकारकक्षा ओलांडून काम करणाऱ्या बीसीसीआयचे महाव्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या, प्रशासकीय समितीने श्रीधर यांचा राजीनामा तात्काळ मंजूर केल्याचं समजतंय. आज प्रशासकीय समितीसोबत झालेल्या बैठकीत श्रीधर यांनी आपला राजीनामा दिल्याचं कळतंय.

पुढील काही काळासाठी बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी श्रीधर यांचं काम पाहणार आहेत. आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरीही कामकाजाची घडी व्यवस्थित बसवली जावी, याकरता ३० सप्टेंबरपर्यंत श्रीधर बीसीसीआयमध्ये काम करणार आहेत.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना श्रीधर हे आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी चांगलेच चर्चेत आले होते. बीसीसीआयच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्यानंतर श्रीधर यांना हैदराबादवरुन मुंबईत येण्याची विनंती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र श्रीधर आपलं कामकाज मुंबईत येऊन जाऊन करायचे. या कार्यपद्धतीमुळे बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी नाराज होते.

त्याआधी दुलीप करंडकाची स्पर्धा रद्द करण्यावरुनही श्रीधर यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशासकीय समितीला विश्वासात न घेता श्रीधर यांनी सोहम देसाई या ट्रेनरची नेमणुक केली. या सर्व प्रकरणावरुन प्रशासकीय समिती नाराज होती, त्याचं पर्यावसन अखेर श्रीधर यांच्या राजीनाम्यात झालं.