भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेतील (आयसीए) माजी क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी टीका भारताचे माजी सलामीवीर अंशुमन गायकवाड यांनी केली आहे. ‘बीसीसीआय’ने मात्र ‘आयसीए’कडून पाठवण्यात आलेल्या पत्राबाबत अजून जाहीर भाष्य केलेले नाही.

‘बीसीसीआय’ची कार्यकारिणी समितीची बैठक येत्या शनिवारी होत आहे. त्यानिमित्ताने ‘आयसीए’चे सदस्य गायकवाड यांनी ‘बीसीसीआय’ला पत्र पाठवून माजी क्रिकेटपटूंच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे. ‘बीसीसीआय’ त्यांच्या दैनंदिन व्यवहाराविषयीची माहितीदेखील कार्यकारिणीत निवडून आलेल्या ‘आयसीए’मधील दोन सदस्यांना सांगत नाही, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. ‘आयसीए’कडून ‘बीसीसीआय’च्या कार्यकारिणी समितीत गायकवाड यांच्यासह महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांत ‘बीसीसीआय’च्या ज्या काही बैठका झाल्या आहेत, त्यातील तपशीलही सांगण्यात आला नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. गायकवाड यांनी विविध मागण्यांची पत्रे याआधी अनेकवेळा ‘बीसीसीआय’ला पाठवली आहेत, असे ‘आयसीए’ अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

‘‘बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांना तीन वेळा आम्ही विविध मागण्यांची यादी पत्राद्वारे पाठवली आहे. निवृत्तीवेतनात वाढ करणे, वैद्यकीय विमा पाच लाखांवरुन १० लाख करणे तसेच दिवंगत प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या विधवा पत्नीला निवृत्तीवेतन देणे या मागण्या आहेत. १० ते २४ सामन्यांचे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळावे हीदेखील मागणी आहे. मात्र या मागण्या सतत करुनही ‘बीसीसीआय’कडून कोणताच प्रतिसाद नाही,’’ असे मल्होत्रा यांनी सांगितले.

‘बीसीसीआय’च्या कार्यकारिणीतील सदस्य या नात्याने प्रसारमाध्यमे, क्रिकेटपटू किंवा राज्य क्रिकेट संघटनाही नवीन घडामोडींबाबत माहिती विचारत असतात. यास्थितीत कार्यकारिणी समिती सदस्यांना या सर्व घडामोडींची माहिती देणे गरजेचे आहे, असे ‘एसीए’च्यावतीने गायकवाड यांनी म्हटले आहे. कार्यकारिणी समितीच्या सर्वच सदस्यांना ‘आयपीएल’ पाहण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला परवानगी मिळालेली नाही याउलट ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी ‘आयपीएल’ सामन्यांना उपस्थित दिसत आहेत, या विषयाकडेही गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.