आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी मुख्य प्रायोजक म्हणून VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार मोडल्यानंतर बीसीसीआयने तेराव्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपसाठी नवीन निवीदा मागवल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक पत्रक जाहीर करत याबद्दल माहिती दिली. तसेच स्पॉन्सरशिपसाठी निवीदा भरत असताना बीसीसीआयने कंपन्यांसाठी काही नियम व अटीही घातल्या आहेत. कोणत्याही निवीदा प्रक्रियेत सर्वोच्च बोली लावणाऱ्यांना यश मिळतं, परंतू आयपीएल प्रायोजकत्वासाठी सर्वोच्च बोली लावणाऱ्यांनाच अधिकार मिळतील असं आवश्यक नसणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय युएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवणार आहे. जाणून घेऊयात बीसीसीआयचे महत्वाचे नियम…

१) ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल ही किमान ३०० कोटी इतकी आहे अशाच कंपन्यांनी आपली निवीदा पाठवावी. तसेच ज्या कंपन्यांची उलाढाल ही ३०० कोटी इतकी आहे त्यांनी आपले ऑडीट रिपोर्ट सोबत पाठवणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

२) नवीन स्पॉन्सर्ससोबत साडेचार महिन्यांचा करार केला जाईल. १४ ऑगस्टपर्यंत अर्ज जमा केले जातील तर ज्या कंपनीला कंत्रात मिळेल त्याचं नाव १८ ऑगस्ट रोजी जाहीर केलं जाईल. स्पॉन्सरशिपचे हक्क १८ ऑगस्ट २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालवधीपर्यंतच असतील.

३) बोर्डाने स्पष्ट केले की, मध्यस्थ किंवा एजंट या प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत. कोणत्याही निवीदेत मध्यस्थाचा सहभाग आढळला तर अशाप्रकारच्या बोली रद्द केल्या जातील. यासाठी बीसीसीयचे अधिकारी, कर्मचारी किंवा एजंट कोणत्याही परिस्थितीत किंमत, देणगी, नुकसान किंवा कोणत्याही प्रकारच्या खर्चासाठी जबाबदार असणार नाहीत.

४) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निवीदेत सर्वाधिक रक्कम लावून हक्क मिळणार नाहीत. तर कंपनीचा ब्रँड हा आयपीएलसाठी किती फायदेशीर आहे हा विचारही केला जाईल.