भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. सध्याचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर संपुष्टात येत आहे.

”भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या वतीने मी सर्व इच्छुकांना अर्ज करण्याची विनंती करतो.”, असं बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितलं.

कुंबळे यांचा कार्यकाळ संपु्ष्टात येत असला तरी त्यांचा नव्या प्रशिक्षक नेमणुकीत थेट समावेश होणार आहे. कुंबळे यांना अर्ज करावा लागणार नाही. संघाच्या प्रशिक्षक पदाच्या नेमणुकीची प्रक्रिया प्रामाणिक आणि पारदर्शक होण्यासाठी प्रशासकीय समितीचा एक सदस्य यावर लक्ष ठेवून असणार आहे. बीसीसीआयने नेमलेली सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ही त्रिसदस्यीय समिती अर्जदारांच्या मुलाखती घेणार आहेत. इच्छुक उमेदवारांना ई-मेलच्या माध्यमातून आपले अर्ज ३१ मे २०१७ पर्यंत पाठवावे लागणार आहेत.

कुंबळे यांची २०१६ साली वर्षभराच्या कालावधीसाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक केली होती. कुंबळेंच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने चांगल्या कामगिरीची नोंद केली. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका कुंबळेंच्या मार्गदर्शनाची पहिली मालिका होती. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिजपाठोपाठ, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकली.