आगामी काळातील दौऱ्यांच्या नियोजन बैठकीत बीसीसीआय, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एकट पाडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी बीसीसीआय पाकिस्तानला आपल्या यादीबाहेर ठेवणार असल्याचं कळतंय. २०१९ साली आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला मान्यता दिली आहे. दोन वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत कसोटी क्रमवारीतले सर्वोत्तम ९ संघ सहा कसोटी मालिका खेळणार आहेत. यातील ३ कसोटी या घरच्या मैदानावर तर ३ कसोटी या प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळवण्यात येतील.

आगामी वर्षांमधल्या दौऱ्यांचं नियोजन करण्यासाठी आयसीसीची ७ आणि ८ डिसेंबरला सिंगापूरमध्ये एक बैठक होणार आहे. या बैठकीत बीसीसीआय भारतीय संघ; ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश या सहा संघांविरुद्ध मालिका खेळण्यासाठी तयार असल्याचं सांगणार असल्याचं कळतंय. याचसोबत बीसीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या करारानूसार दोन देशांमधले सामने रद्द करुन घेण्याकडेही बीसीसीआयचा कल असण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि सचिव अमिताभ चौधरी आयसीसीच्या या बैठकीला हजेरी लावणार असल्याचं समजतंय.

“दोन देशांमध्ये मालिका खेळवण्यावरुन करार झालेला असला, तरीही दोनही देशांमधल्या राजकीय परिस्थितीचं आयसीसीला भान आहे. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी स्वतः काही काळासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. भारत सरकार दोन देशांमधल्या क्रिकेट सामन्यांसाठी आम्हाला परवानगी देणं अशक्य असल्याने आगामी काळात भारत-पाक सामने होणं अशक्य आहे.” बीसीसीआयमधली एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

याचसोबत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने निवडलेल्या ६ प्रतिस्पर्ध्यांना मान्यता मिळण्याचे संकेतही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील नागपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला हजेरी लावली होती. यावेळी आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहरही सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. या दोघांमध्ये आयसीसीच्या आगामी बैठकीविषयी चर्चा झाल्याची माहिती समजते आहे.