बीसीसीआयच्या Cricket Operations विभागाचे महाव्यवस्थापक साबा करीम यांनी दिवस-रात्र कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआय सकारात्मक असल्याचं वक्तव्य केलं आहे. Cricbuzz या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत साबा करीम यांनी हे संकेत दिले आहेत. “दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यासाठी बीसीसीआय सकारात्मक विचार करत आहे. जर आपण मोठ्या पातळीवर जाऊन विचार केला तर आतापर्यंत सर्व सदस्यांनी दिवस-रात्र कसोटी सामना खेळलेला आहे. मात्र भारतानेच आतापर्यंत दिवस-रात्र कसोटी सामना खेळलेला नाही. या कारणामुळेच बीसीसीआय लवकरात लवकर दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामना भरवण्याच्या तयारीत आहे”, साबा करीम यांनी बीसीसीआयची बाजू स्पष्ट केली.

भारताने आतापर्यंत स्थानिक क्रिकेटमध्ये गुलाबी रंगाच्या चेंडूवर सामना खेळवला आहे. आयसीसीशी संलग्न असणाऱ्या देशांपैकी कसोटी सामना खेळणाऱ्या पहिल्या ८ संघांनी आतापर्यंत दिवस-रात्र कसोटी खेळलेली आहे. मात्र भारत आणि श्रीलंकेने अजुनही आंतरराष्ट्रीय पातळीवर गुलाबी रंगाच्या चेंडूशी क्रिकेट खेळलेलं नाहीये. या कारणांमुळेच बीसीसीआय आता दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्याच्या विचारात असल्याचं समजतंय.

यंदाच्या वर्षात ऑक्टोबर महिन्यामध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत दोन्ही संघ २ कसोटी सामने खेळणार आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ आपला पहिला दिवस-रात्र सामना खेळण्याची दाट शक्यता आहे. कसोटी सामन्यांना प्रेक्षकांकडून मिळणारा कमी प्रतिसाद लक्षात घेऊन आयसीसीसीने काही महिन्यांपूर्वी दिवस-रात्र कसोटी सामन्यांची घोषणा केली होती. दिवस-रात्र कसोटी सामना ठेवल्यास प्रेक्षक कसोटी सामन्यांनाही गर्दी करतील असा विश्वास आयसीसीने व्यक्त केला होता. त्यामुळे भारतात दिवस-रात्र कसोटी सामन्याला कधी मुहूर्त सापडतो याकडे सर्व क्रीडारसिकांचं लक्ष असणार आहे.