देशात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाचा आयपीएलचा हंगाम युएईमध्ये आयोजित केला आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. २०२१ साली होणाऱ्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने खेळाडूंचा पुन्हा एकदा लिलाव करण्याचं ठरवलं होतं. यासाठी २०२० च्या हंगामाचा लिलाव हा छोटेखानी स्वरुपात पार पडला होता. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि तेरावा हंगाम संपल्यानंतर चौदाव्या हंगामासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेता बीसीसीआय पुढील हंगामाचा लिलाव स्थगित करण्याची शक्यता असल्याचं कळतंय.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या पुढील हंगामात सर्व संघमालकांना याच खेळाडूंनिशी मैदानात यावं लागेल. अखेरच्या क्षणी एखाद्या खेळाडूने माघार घेतली किंवा दुखापतीचे प्रसंग झाल्यास खेळाडू अदलाबदल करण्याची परवानगी मिळेल. १० नोव्हेंबरला तेरावा हंगाम स्थगित झाल्यानंतर पुढील हंगामाच्या तयारीसाठी बीसीसीआयला फक्त ४ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. ज्यात ६० सामन्यांचं आयोजन, वेळापत्रक, सरकारी परवानग्या यासाठी बराच काळ खर्च होणार आहे. यासाठी बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

पुढील हंगामात खेळाडूने आहे त्या संघाकडूनच खेळावं लागू शकतं.

 

महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश संघमालकांचाही बीसीसीआयच्या या निर्णयाला पाठींबा असल्याचं कळतंय. २०२१ आयपीएलनंतर भारतीय संघाने श्रीलंकेत मालिका खेळणं अपेक्षित आहे. यानंतर भारतीय संघाला आशिया चषकातही सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं व्यस्त वेळापत्रक व इतर बाबी लक्षात घेता बीसीसीआयने पुढील वर्षासाठी खेळाडूंचा लिलाव स्थिगत करणार आहे.