लोढा समितीने आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय दिल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी पुढील रुपरेषा आखण्यात व्यस्त आहेत. चेन्नई आणि राजस्थान या दोन संघांवर बंदी घालण्यात आल्याने बीसीसीआयकडून वेगवेगळ्या पर्यायांवर विचार केला जात आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन संघ बीसीसीआयच्या अधिपत्याखाली घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नावाने हे दोन संघ आयपीएलमध्ये खेळतील. संघातील खेळाडूंचे मानधन आणि इतर निगडीत खर्च बीसीसीआयकडूनच केला जाईल. आयपीएलमधील संघांना बीसीसीआयला द्यावे लागणारे वार्षिक फ्रँचाईजी शुल्क देखील या दोन संघांना भरावे लागणार नाही. राजस्थान क्रिकेट मंडळाला जसे बीसीसीआयने दत्तक घेतले त्याप्रमाणेच या दोन संघांचीही काळजी बीसीसीआयकडून घेतली जाईल, असेही बीसीसीआयच्या अधिकाऱयाने सांगितले. दरम्यान, गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या माजी आयपीएल प्रमुख ललित मोदी यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या राजस्थान क्रिकेट असोसिएशनला नंतर बीसीसीआयने दत्तक घेतले.