अनुभवी क्रिकेटपटू मिताली राजची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) श्रेणीनिहाय वार्षिक क्रिकेटपटूंच्या यादीत गुरुवारी ‘अ’ श्रेणीतून ‘ब’ श्रेणीत पदावनती करण्यात आली आहे. राधा यादव आणि तानिया भाटिया यांचाही ‘ब’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या ३७ वर्षीय मितालीचा ५० लाख रुपये वार्षिक मानधन असलेल्या ‘अ’ श्रेणीत अपेक्षेप्रमाणेच समावेश करण्यात आलेला नाही. मितालीकडे सध्या एकदिवसीय प्रकाराचे कर्णधारपद असून २०२१च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

ट्वेन्टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौरने ‘अ’ श्रेणीतील स्थान टिकवले आहे. या श्रेणीत स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. १५ वर्षीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि हर्लीन देवोल यांना प्रथमच वार्षिक करार मिळाला आहे. या यादीतून मोना मेश्रामला वगळण्यात आले आहे.

श्रेणीनिहाय मानधन

‘अ’ श्रेणी (५० लाख रु.)

हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, पूनम यादव.

‘ब’ श्रेणी (३० लाख रु.)

मिथाली राज, झुलन गोस्वामी, एकता बिश्त, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, तानिया भाटिया.

‘क’ श्रेणी (१० लाख रु.)

वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी. हेमलता, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार, हर्लिन देवोल, प्रिया पुनिया, शेफाली वर्मा.