आयपीएलच्या आगामी हंगामामध्ये, गव्हर्निंग काऊन्सिल मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. जगभरातील क्रिकट चाहत्यांची पसंती मिळवलेल्या आयपीएलमध्ये पुढील हंगामात Power Player नावाची एक नवीन संकल्पना राबवण्यात येणार आहे. बीसीसीआयमधली वरिष्ठ अधिकाऱ्याने IANS वृत्तसंस्थेला माहिती दिली.

“या नवीन संकल्पनेला मान्यता मिळालेली आहे. मंगळवारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात यावर अधिक चर्चा होईल. या नवीन संकल्पनेनुसार, दोन्ही संघ आपला अंतिम ११ जणांचा संघ जाहीर न करता १५ खेळाडूंचा संघ जाहीर करतील. सामना सुरु झाल्यानंतर विकेट पडल्यानंतर किंवा कोणत्याही वेळी षटक संपल्यानंतर बदली खेळाडूला मैदानात उतरवता येऊ शकतं. आयपीएलमध्ये ही संकल्पना राबवण्याच्या आधी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ही संकल्पना राबवण्यात येईल”, अधिकाऱ्याने माहिती दिली.

या नवीन संकल्पनेमुळे आयपीएलमधील सामन्यांचं चित्र बदलण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एका षटकात विजयासाठी २० धावांची गरज आहे आणि आंद्रे रसेलसारखा खेळाडू तुमच्या अंतिम ११ जणांच्या संघात नाहीये. मात्र अशावेळी तुम्ही संघ म्हणून आंद्रे रसेलला संधी देऊ शकता. याच पद्धतीने अखेरच्या षटकात समोरच्या संघाला विजयासाठी ६ धावांची गरज आहे आणि बुमराह सारखा गोलंदाज तुमच्या संघात नसेल तर १९ व्या षटकात तुम्ही बुमराहला संधी देऊ शकता, बीसीसीआय अधिकाऱ्याने नवीन संकल्पनेबद्दल माहिती दिली. त्यामुळे आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल या नवीन निर्णयाला कधी मान्यता देते हे पहावं लागणार आहे.