देशात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पद्मभूषण पुरस्कारासाठी ‘बीसीसीआय’ने यंदा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावाची शिफारस केली आहे. बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, धोनीच्या नावावर सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्याचही या अधिकाऱ्याने सांगितले.

क्रिकेटच्या क्षेत्रात धोनीने दिलेल्या योगदानाबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये. आतापर्यंत भारताला दोन विश्वचषक जिंकवून देण्यात धोनीचा महत्वाचा वाटा आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही क्षेत्रात धोनीने आतापर्यंत केलेल्या धावा, संघ उभारणीत त्याचं असलेलं योगदान या सर्व गोष्टींचा विचार करता धोनी हाच पद्मभूषण पुरस्कारासाठी योग्य उमेदवार असल्याचं, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी बीसीसीआयने कोणाचीही शिफारस केलेली नाहीये.

३६ वर्षीय धोनीने ३०२ वन-डे सामन्यांमध्ये ९७३७ धावा केल्या असून ९० कसोटी सामन्यांमध्ये धोनीच्या नावावर ४८७६ धावा जमा आहेत. याशिवाय, ७८ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये धोनीने आतापर्यंत १२१२ धावा केल्या आहेत. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये मिळून धोनीच्या नावावर १६ शतकं आहेत. नुकतंच धोनीने अर्धशतकांचं शतक पूर्ण केलं होतं. यष्टीरक्षक म्हणून तिन्ही प्रकारांमध्ये धोनीने ५८४ झेल घेतले आहेत. तर धोनीने आतापर्यंत १६३ फलंदाजांना यष्टीचीत केलं आहे.

याआधी धोनीला ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन’, ‘पद्मश्री’ अशा मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. धोनीच्या नावावर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्यास पद्मभूषण पुरस्कार मिळणारा धोनी ११ वा क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर, कपील देव, सुनील गावसकर, राहुल द्रवीड, चंदू बोर्डे यासारख्या दिग्गज खेळाडूंना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे.