भारत आणि इंग्लंडमधील मँचेस्टर टेस्ट करोनामुळे रद्द करण्यात आली. आता या कसोटीलसाठी बीसीसीआय आणि ईसीबी पुढील वर्षी प्रयत्न करणार असल्याचे समोर आले होते. पण आता बीसीसीआयने ईसीबीला एक नवा प्रस्ताव दिला आहे. या कसोटीबदली बीसीसीआयने इंग्लंडला दोन अतिरिक्त टी-२० सामने खेळण्याची ऑफर दिली आहे. भारतीय संघ पुढील वर्षी जुलैमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे, त्यावेळी तो तीन टी-२० सामने खेळणार आहेत. आता ही मालिका पाच सामन्यांची असावी, अशी ऑफर बीसीसीआयने ईसीबीला दिली आहे.

क्रिकबझच्या अहवालानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले, ”पुढील वर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात आम्ही दोन अतिरिक्त टी-२० सामने खेळण्याची ऑफर दिली हे खरे आहे. तीन टी-२० ऐवजी आम्ही पाच टी-२० खेळू. वैकल्पिकरित्या, आम्ही देखील एक कसोटी खेळण्यास तयार आहोत. यापैकी एक ऑफर निवडणे हे त्यांच्यावर आहे.”

भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये एका सदस्याला करोनाचा संसर्ग झाल्यानंतर मँचेस्टर येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळण्यास संघाने असमर्थता व्यक्त केली. खेळाडूंच्या मानसिकतेवरही परिणाम झाला. यानंतर सामना रद्द करण्यात आला.

हेही वाचा – “मध्यरात्री विराटनं BCCIला…”, मॅंचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर इंग्लंडच्या माजी कप्तानानं केलं धक्कादायक वक्तव्य!

यूकेमधील डेली मेलनेही एका अहवालात म्हटले, की बीसीसीआयने ही अशी ऑफर दिली जेणेकरून ईसीबीला ३०० पेक्षा अधिक कोटींच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी करता येईल. याशिवाय, उर्वरित अंतिम कसोटीचे वेळापत्रक बदलणे हा देखील एक पर्याय आहे ज्याची जय शहा यांनी माहिती दिली आहे.

पाचव्या कसोटीआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे, अखेरची कसोटी खेळली जाणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. सर्व खेळाडूंची करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सामना सुरू होईल अशी आशा व्यक्त केली गेली. मात्र, संभाव्य धोका न पत्करता भारताने सामना न खेळण्याचा निर्णय घेतला.