जे भारतीय खेळाडू भारताच्या संघात आपलं स्थान टिकवण्याच्या शर्यतीमध्ये नाहीत, त्यांना विदेशी टी २० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात यावी असे मत सुरेश रैना आणि इरफान पठाणने नुकतेच व्यक्त केले. त्यांनी इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान याबाबतची BCCI मागणी केली. “भारतीय खेळाडूंना विदेशी टी २० लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी अशी माझी इच्छा आहे. BCCI ने यावर विचार करायला हरकत नाही. किमान दोन वेगळ्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळायला हवी. जर बाहेरच्या देशातील स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी केली, तर हे आमच्यासाठी चांगलं असणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूने अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं आहे.” असे सुरेश रैनाने म्हटले होते.

T20 World Cup : धोनी, धवन संघाबाहेर; समालोचकाने जाहीर केला संघ

सुरेश रैनाच्या मागणीला पाठींबा देत इरफान पठाणनेही हीच मागणी केली होती. “प्रत्येक देशातील खेळाडूंची विचार करण्याची एक वेगळी पद्धत असते. मायकल हसीने २९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघाकडून पदार्पण केलं. भारतात कोणताही खेळाडू असा विचार करु शकेल असं मला वाटत नाही. जोपर्यंत तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहातस तोवर तुम्ही देशासाठी खेळत राहणं गरजेचं आहे. ज्या खेळाडूंचं वय ३० आहे आणि जे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत नाहीत असं तुम्हाला वाटतं, त्यांना विदेशी टी २० लीग खेळण्याची परवानगी मिळाली पाहिजे”, असे इरफान म्हणाला होता.

BCCI च्या अधिकाऱ्याचे उत्तर

“सामान्यत: निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या खेळाडूंकडून अशी मागणी होणं स्वाभाविक आहे. त्यात काहीच चुकीचं नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाला विचार करण्याचा आणि त्यानुसार मत मांडण्याचा अधिकार आहे. भारतीय खेळाडूंना विदेशी टी २० लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास परवानगी नाकारण्यामागचा उद्देश इतकाच आहे की जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळू शकतील असं वाटत नाही, त्यांनी ती उर्जा IPL साठी वाचवून ठेवावी आणि लिलावादरम्यान चांगली कामगिरी करावी. भारतीय खेळाडूंचं वेगळेपण कायम राखणं हाच या निर्णयामागचा मूळ उद्देश आहे”, असे उत्तर BCCI च्या अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त इंग्रजी प्रसारमाध्यमाने आयएएनएस वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिले आहे.

धोनीच्या प्लॅनिंगपुढे पॉन्टींगही फिका – माईक हसी

दरम्यान, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्याशिवाय BCCI आपल्या कोणत्याही खेळाडूला विदेशी टी २० लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. गेल्या वर्षी युवराज सिंगने कॅनडातील ग्लोबल टी २० स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलं होतं. विदेशी टी २० लीगमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.