भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, प्रत्येक सामन्यासाठी पंच, स्कोअरर आणि व्हिडीओ अनॅलिस्ट यांचेही मानधन दुप्पट करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. भारताचे माजी यष्टिरक्षक सबा करीम यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन विभागाने हा निर्णय घेतला आहे. मानधन वाढीचा प्रस्ताव हा १२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत क्रिकेट ऑपरेशन्स विभागाने प्रशासकीय समितीच्या सल्ल्याने ठेवला होता. मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचे मानधन वाढवण्यात यावे, असा प्रशासकीय समितीचेही मत होते.
सध्याही मिळते भरघोस मानधन
सध्या प्रसाद यांना वर्षाला ८० लाख रुपये मानधन देण्यात येते, तर इतर ४ सदस्यांना प्रतिवर्षी ६० लाख रुपये मानधन मिळते. या समितीतील गगन खोडा आणि जतीन परांजपे हे दोन सदस्य हे सध्या संघ निवड प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. पण तरीदेखील त्यांना निवड समितीतील देवांग गांधी आणि सरणदीप सिंग या दोन कार्यरत सदस्यांइतकेच मानधन देण्यात येते. त्यामुळे हा या दोन कार्यरत सदस्यांवर हा एकप्रकारे अन्याय आहे, असे मत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतच निवड समिती सदस्यांबाबत निर्णय घेता येत असल्यामुळे मंडळाच्या नियमानुसार खोडा आणि परांजपे यांना मानधन देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
प्रशासकीय समितीच्या प्रस्तावानुसार निवड समिती अध्यक्षांना १ कोटीच्या घरात तर इतर कार्यकारी सदस्यांना ७५ ते ८० लाखांच्या घरात वार्षिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, देशांतर्गत सामन्यांसाठी काम पाहणारे सामनाधिकारी, पंच, स्कोअरर आणि व्हिडीओ अनॅलिस्ट यांचेही मानधन दर सहा वर्षांनी दुप्पट करण्यात येणार असल्याचा विचार सुरु आहे.
खजिनदारांना मात्र पत्ताच नाही…
दरम्यान, बीसीसीआयचे खजिनदार असलेले अनिरुद्ध चौधरी यांनी आपल्या या मानधन वाढीच्या बाबत काहीही कल्पना नसल्याचे म्हटले आहे. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना समाविष्ट करण्यात आलेले नसल्याचेही म्हटले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 31, 2018 12:42 pm