भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात सांकेतिक भाषेत रंगलेलल्या संभाषणाचा एक व्हिडिओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. या व्हिडिओला चांगलीच लोकप्रियता मिळत असून, यावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात अखेरच्या दिवशी विराट कोहलीनं नाबाद शतकी खेळी केली होती.

अखेरच्या सामन्यात विराट कोहली ८६ धावांवर खेळत असताना भारतीय संघाने १९९ धावांची आघाडी घेतली. यावेळी विराट कोहली ड्रेसिंगरुममध्ये बसलेल्या रवी शास्त्रींसोबत सांकेतिक भाषेत संवाद साधताना दिसला. कोहली डाव घोषित करण्याबाबत शास्त्री यांचा सल्ला घेत असावा, अशी चर्चा देखील क्रिकेट वर्तुळात रंगली. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. रवी शास्त्री डाव घोषित करण्यास सांगत होते, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली असून काहींनी शतक साजरे करुन माघारी फिरण्याचा सल्ला शास्त्रींनी दिला असावा, असा अंदाज वर्तवला आहे.

रवी शास्त्रींच्या हाताचे इशारे बारकाईने पाहिल्यास आणखी २० धावा केल्यानंतर डाव घोषित करण्यास हरकत नाही, असे त्यांनी सांगितल्याचे दिसते. यावेळी भारतीय संघाने २२१ धावा केल्या होत्या. कोहली आणि शास्त्री यांच्यातील सांकेतिक संभाषणानंतर कोहलीनं कारकिर्दीतील ५० वे शतक साजरे करुन ८ बाद २५२ धावांवर डाव घोषित केला. भारतीय संघाने श्रीलंकेसमोर २३१ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरा दाखल श्रीलकेच्या संघाची ७ बाद ७५ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मात्र, अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आल्याने सामना अनिर्णित ठेवण्यात श्रीलंकेला यश आले.