IND vs WI : विंडिजविरुद्धचा भारताचा दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून हैदराबाद येथे होणार आहे. या लढतीसाठी भारतीय संघाने बुधवारी कसून सराव केला. पहिल्या सामन्यात भारताला सहज विजय मिळवता आला होता. पण त्यामुळे गाफील न राहता टीम इंडियाने जोरदार सराव केला. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या सत्रात टीम इंडियाच्या मदतीला धावून आलेल्या नव्या ‘सहकाऱ्या’ची अधिक चर्चा रंगली होती.

हा नवा सहकारी म्हणजे ‘फिल्डींग ड्रिल मशीन’ आहे. खेळाडूंना क्षेत्ररक्षणाचा अधिकाधिक सराव व्हावा म्हणून हा सहकारी चमूत दाखल झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – BCCI या संबंधीचे ट्विट केले आहे. ‘फिल्डींग ड्रिल मशीन’ हे बॉलिंग मशीनची छोटी आवृत्ती आहे. ही मशीन चेंडू जमिनीलगत वेगाने फेकते आणि त्याने खेळाडूंचा झेल टिपण्याचा सराव होत आहे.

BCCIने या मशीनचा संपूर्ण व्हिडीओ वेबसाईटवर टाकला असून त्याची लिंक ट्विटवर पोस्ट केली आहे. यात कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर पृथ्वी शॉ या मशीनच्या मदतीने झेल घेण्याचा सराव करताना दिसत आहेत.

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना या मशीनचे सहकार्य होत असल्याचे म्हटले जात आहे. या मशीनबद्दल ते भरभरून बोलले आहेत. ‘नव्या सहकारी आता हळूहळू संघातील अन्य खेळाडूंसह रुळू लागला आहे. आम्हाला स्लिपमध्ये झेल टिपण्याचा सराव देणारे हे मशीन फार उपयुक्त ठरत आहे’, असेही ते म्हणाले.