दिल्ली सरकारचा सामन्यांच्या आयोजनास नकार; नंतरही स्पर्धा होण्याविषयी संभ्रम

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या भीतीमुळे गर्दी टाळण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य विभागाने केल्यानंतर दडपणाखाली असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अखेर यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘‘करोनाच्या धास्तीमुळे खबरदारीचे उपाय म्हणून बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्पर्धेला स्थगिती दिली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. देशभरात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून दिल्ली सरकारने राजधानीतील सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली हे आयपीएलमधील फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सचे घरचे मैदान आहे.

बीसीसीआयने २९ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत आयपीएलला स्थगिती दिली असली तरी १५ एप्रिलपासून ही स्पर्धा सुरू होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता केलेली नाही. जरी १५ एप्रिलनंतर आयपीएलला सुरुवात झाली तरी बंदिस्त स्टेडियममध्ये किंवा प्रेक्षकांविना ही स्पर्धा खेळवण्यात येईल.

आता मुंबईत शनिवारी रंगणाऱ्या आयपीएल गव्हर्निग कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ‘‘सर्व समभागधारक तसेच चाहत्यांच्या आरोग्याविषयी बीसीसीआय संवेदनशील आहे. सर्वानाच सुरक्षितपणे क्रिकेटचा आनंद घेता यावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्रीय क्रीडा मंत्रालय, आरोग्य विभाग तसेच केंद्र सरकारच्या अन्य विभागांसोबत आम्ही याविषयी चर्चा करत असून योग्य तो निर्णय घेतला जाईल,’’ असेही शाह यांनी सांगितले.

‘‘परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्याबाबतीतचे निर्बंध १५ एप्रिल रोजी उठतील, तोपर्यंत ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. परदेशी खेळाडूंव्यतिरिक्त ही स्पर्धा घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट मत फ्रेंचायझींनी व्यक्त केले आहे. व्हिसाचे निर्बंध यापुढेही कायम राहिले आणि तीन राज्यांनी ही स्पर्धा भरविण्यास विरोध केला तर अन्य समस्यांना सामोरे जावे लागेल,’’ असेही बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

१५ एप्रिलनंतर आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भविष्यातील दौरा कार्यक्रमानुसार ४० दिवसांत ही स्पर्धा संपवावी लागेल. ‘‘दिल्ली (दिल्ली कॅपिटल्स), बेंगळूरु (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु) आणि महाराष्ट्र सरकारने (मुंबई इंडियन्स) आयपीएलच्या सामन्यांना विरोध केला तरी पर्यायी ठिकाणांची व्यवस्था करण्यात आली आहे,’’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. लखनौ, राजकोट, इंदूर, रायपूर आणि विशाखापट्टणम ही पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. स्टार स्पोर्ट्सने प्रक्षेपण हक्कांसाठी पाच वर्षांकरिता १६,३४७ कोटी रुपयांची बोली लावली होती. प्रत्येक वर्षी त्यांना ५५०० कोटी रुपये मोजावे लागणार असले तरी यंदाची स्पर्धा रद्द झाल्यामुळे त्यांना बीसीसीआयशी याविषयी पुन्हा बोलणी करावी लागणार आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

० करोनाच्या भीतीमुळे दिल्लीतील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.

० ‘आयपीएल’ला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली असली तरी यापुढे ही स्पर्धा होईल किंवा रद्द करण्यात येईल, याविषयी कोणतीही  सुस्पष्टता नाही.

० मुंबईत शनिवारी आयपीएल गव्हर्निग कौन्सिलच्या बैठकीत यंदाच्या ‘आयपीएल’विषयीचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

० महाराष्ट्र, कर्नाटक तसेच दिल्ली सरकारने सामने आयोजित करण्यास नकार दर्शवला तरी पाच ठिकाणे तयार करण्यात येणार आहेत.

० लखनौ, राजकोट, इंदूर, रायपूर, विशाखापट्टणम यासारख्या अन्य ठिकाणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.० पुण्यात करोनाचे आतापर्यंत १० रुग्ण आढळून आल्यामुळे या ठिकाणाचा विचार करण्यात आलेला नाही.

भारत-द. आफ्रिका यांच्यातील दोन एकदिवसीय सामने रद्द

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लखनौ आणि कोलकाता येथे होणारे उर्वरित दोन एकदिवसीय सामने करोनामुळे रद्द करण्यात आले आहेत. ‘‘इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्थगित करण्यात आल्यामुळे हे दोन सामने आयोजित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संपूर्ण देश एका मोठय़ा आव्हानाचा सामना करत आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्याने सांगितले. गेल्या तीन दशकात मालिका अर्धवट स्थितीत रद्द करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. धरमशाला येथील पहिला एकदिवसीय सामना  पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दोन्ही संघ शुक्रवारी लखनौ येथे दाखल झाले आहेत. ‘‘दक्षिण आफ्रिकेचा संघ दिल्लीत येईल, त्यानंतर लवकरात लवकर उपलब्ध असलेल्या विमानाने मायदेशी रवाना होईल,’’ असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर बीसीसीआयने हे दोन्ही सामने बंद दाराआड म्हणजेच प्रेक्षकांविना घेण्याचे ठरवले होते. पण आता हे दोन्ही सामने रद्द करण्यात आले आहेत.

सुरक्षिततेला आमचे प्रथम प्राधान्य राहील. त्यामुळे आम्ही स्पर्धा लांबणीवर टाकली आहे. आता पुढे काय होतेय ते पाहिल्यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ. आताच त्याविषयी काहीही बोलणे उचित ठरणार नाही. फ्रेंचायझी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. कारण अन्य कोणताही पर्याय आमच्याकडे उपलब्ध नाही. – सौरव गांगुली, बीसीसीआयचा अध्यक्ष

* देशातील बुद्धिबळ स्पर्धा ३१ मेपर्यंत लांबणीवर

चेन्नई : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) करोनाच्या धास्तीमुळे देशात होणाऱ्या सर्व राष्ट्रीय स्पर्धा ३१ मेपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. राज्य संघटनांनीसुद्धा आपल्या राज्यस्तरीय स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत घेऊ नयेत, असेही ‘एआयसीएफ’ने कळवले आहे. ‘‘सर्व राष्ट्रीय स्पर्धा ३१ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून नवीन तारखा लवकरच कळवण्यात येतील,’’ असे एआयसीएफचे मानद सचिव भरत सिंग चौहान यांनी सांगितले.

* इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेविषयी संभ्रम

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने क्रीडाविषयक सर्व स्पर्धावर बंदी घातल्यानंतर आता इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनाबाबत नवा संभ्रम निर्माण झाला आहे. करोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी ही स्पर्धा प्रेक्षकांविना घेण्याचा निर्णय झाला आहे. ‘‘सरकारने जे काही ठरवले असेल त्यानुसारच आम्ही कार्यवाही करू. आम्हाला सरकारच्या निर्णयाचे पालन करावेच लागेल. परदेशी खेळाडूंच्या व्हिसा प्रक्रियेबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही,’’ असे भारतीय बॅडमिंटन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

* सिंधूची फोनवरून क्रीडामंत्र्यांशी चर्चा

अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत खेळायचे की नाही, हे विचारण्यासाठी शुक्रवारी सकाळी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. स्पर्धेत सहभागी हो, पण स्वत:ची काळजी घे, असे क्रीडामंत्र्यांनी तिला सांगितले.

* चेन्नई सुपर किंग्सचे सराव सत्र रद्द

चेन्नई सुपर किंग्स संघाने आपले सराव सत्र शनिवारपासून रद्द केले आहेत. तीन वेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईने २ मार्चपासून एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सरावाला सुरुवात केली होती. त्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांच्यासह अन्य खेळाडूंचा सहभाग होता.

* ‘भारत-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धाही लांबणीवर

करोनाच्या भीतीमुळे मध्य प्रदेशमधील इंदूर येथे होणारी १३वी ‘भारत-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आली आहे.  २० ते २२ मार्चदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे संयोजकांकडून सांगण्यात आले.

* आय-लीग फुटबॉलचे सर्व सामने बंद दाराआड

नवी दिल्ली : आय-लीग फुटबॉलचे उर्वरित २८ सामने बंद दाराआड खेळवण्यात येणार आहेत. मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या कट्टर प्रतिस्पध्र्यामधील सामनाही प्रेक्षकांविना खेळवण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) दिली आहे. ‘‘सामन्याच्या दिवशी खेळाडू, प्रशिक्षक, सामनाधिकारी, वैद्यकीय पदाधिकारी, प्रसारमाध्यमे तसेच गरजू सुरक्षारक्षक यांव्यतिरिक्त कुणालाही स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही,’’  असेही एआयएफएफकडून सांगण्यात आले. एआयएफएफच्या अधिपत्याखाली खेळवण्यात येणारे सामने  बंद दाराआड होत असल्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

* युरो चषक एका वर्षांने लांबणीवर?

पॅरिस : युरोपियन फुटबॉल महासंघाने (यूएफा) जून महिन्यात होणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी यूएफाची कार्यकारी समिती याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे. सध्या जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आल्यानंतर यूएफा विविध पर्यायांचा विचार करत आहे. १२ जून ते १२ जुलैदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी १२ विविध देशांमधील १२ स्टेडियम्सचा वापर केला जाणार आहे. इटली आणि स्पेनमधील लीग स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्याबरोबर चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या परतीच्या लढती पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

* ऑस्ट्रेलियाच्या केन रिचर्डसनला करोनाची बाधा

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आठवडय़ात दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर रिचर्डसनला घशाचा त्रास जाणवू लागला होता. याबाबत त्याने वैद्यकीय पथकाला कळवल्यानंतर त्याची करोना चाचणी घेण्यात आली. त्यात त्याला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. ‘‘रिचर्डसनवर तातडीने उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आली होती,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे सांगण्यात आले. ‘‘रिचर्डसनला फक्त घशाचा त्रास जाणवत असून त्याला ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्देशांनुसार अन्य सहकाऱ्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच त्याला संघात सामील करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल,’’ असे त्याआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले होते.

* इंग्लंडचे क्रिकेटपटू मायदेशी परतले

लाहोर : पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणारे इंग्लंडचे क्रिकेटपटू करोनाच्या धास्तीमुळे शुक्रवारी मायदेशी रवाना झाले आहेत. मोईन अली, जेम्स विन्स, समित पटेल, लियान डॉसन, अ‍ॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, ख्रिस जॉर्डन, जेसन रॉय, टायमल मिल्स, टॉम बँटन यांनी स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी जाणे पसंत केले आहे.

* ऑलिम्पिक ज्योतीचा कार्यक्रम रद्द

ग्रीस ऑलिम्पिक समितीने करोनाच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात चाहत्यांची गर्दी होईल, या भीतीने ऑलिम्पिक ज्योतीचा कार्यक्रम रद्द केला आहे. आता १९ मार्च रोजी ही ज्योत टोक्यो ऑलिम्पिक संयोजकांकडे सुपूर्द करण्यात येईल. पण या कार्यक्रमासाठीही चाहत्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. ग्रीसमध्ये करोनाचे ११७ रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी १० दिवसांत एकाचा मृत्यू झाला आहे.

* चेल्सीचा हडसन, अर्टेटा यांना करोनाची बाधा

चेल्सीचा खेळाडू कलम हडसन-ओडोई आणि आर्सेनलचे प्रशिक्षक मिकेल अर्टेटा यांना करोनाची बाधा झाली आहे. अर्टेटा यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून अर्सेनलने आपले प्रशिक्षण शिबीर रद्द केले आहे. करोनाची बाधा झालेला हडसन-ओडोई हा इंग्लिश प्रीमियर लीगमधील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. हडसनच्या संपर्कात असलेल्या अन्य खेळाडूंनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

* इंग्लिश प्रीमियर लीग ४ एप्रिलपर्यंत स्थगित

लंडन : आर्सेनलचे व्यवस्थापक मिकेल अर्टेटा आणि चेल्सीचा खेळाडू कलम हडसन-ओडोई याला करोनाची लागण झाल्यामुळे इंग्लिश प्रीमियर लीगचे सामने ४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहेत.

‘‘सर्व समभागधारकांच्या झालेल्या बैठकीत सामने ४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. वैद्यकीय सल्ला आणि परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल,’’ असे प्रीमियर लीगच्या पत्रकात म्हटले आहे. खेळाडूंमध्ये करोनाची लक्षणे आढळू लागल्यामुळे एव्हरटन संघाने खेळाडूंना इतरांपासून वेगळे राहण्याचा सल्ला दिला आहे. लिसेस्टर सिटीचे तीन खेळाडू विलगीकरण कक्षात आहेत.