ठाकूर, शुक्ला, शिर्के यांची नावे चर्चेत; आयसीसीच्या कार्याध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा दुसरा डाव सुरू करून सात महिने झाल्यानंतर शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोहर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पहिले स्वतंत्र कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची चिन्हे आहेत. मनोहर यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीवरील प्रतिनिधी म्हणून दिलेले राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत, अशी माहिती सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले न्यायमूर्ती लोढा यांच्या समितीने निर्देशित केलेल्या शिफारशी बीसीसीआयवर अंकुश ठेवण्याच्या तयारीत असतानाच मनोहर यांनी प्रमुखपद सोडले आहे. ठाकूर यांना दिलेल्या पत्रात मनोहर यांनी म्हटले आहे की, ‘‘बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत असून, तो तत्काळ स्वरूपात अमलात येईल. बीसीसीआयच्या सदस्यांनी आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेसाठी प्रतिनिधी म्हणून मला नेमले होते, परंतु या प्रतिनिधित्वाचाही त्याग करीत आहे. माझ्या कार्यकाळात साथ देणाऱ्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांचा मी अत्यंत आभारी आहे. क्रिकेटला मोठय़ा उंचीवर घेऊन जा, अशा शुभेच्छा मी तुम्हा सर्वाना देत आहे.’’

मनोहर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सचिव अनुराग ठाकूर, आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के उत्सुक आहेत.

बीसीसीआयच्या नियमानुसार सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा १५ दिवसांत घ्यावी लागणार आहे. सचिव ठाकूर यांना ही बैठक बोलावता येईल. मनोहर यांनी आयसीसीच्या कार्याध्यक्षपदाचा बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. हा कार्यकाळ जून २०१६पर्यंत होता. त्यामुळे आयसीसीचे पहिले स्वतंत्र कार्याध्यक्ष होण्याचा ५८ वर्षीय मनोहर यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आयसीसी कार्यकारी मंडळाच्या

नव्या नियमांनुसार कार्याध्यक्ष हे कोणत्याही क्रिकेट मंडळाचे सदस्य नसावे. आता फक्त आयसीसी मंडळातील दोन सदस्यांनी त्यांच्या नावाची शिफारस करण्याची आवश्यकता आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहात होते, परंतु यासंदर्भातील निकाल उन्हाळी सुटीनंतरच लागू शकेल. त्यामुळे मनोहर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

सचिवपदावर गांगुली?

शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर घडामोडींना वेग आला असून, बीसीसीआयच्या सचिवपदासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षी जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी गांगुली समर्थपणे बंगाल क्रिकेटचा धुरा सांभाळत आहे. आयपीएल प्रशासकीय समितीवरही तो सध्या सदस्य आहे.