ऑस्ट्रेलियाविरोधातील बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात मिळवलेल्या विजयाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. सौरव गांगुलीने कर्णधार अजिंक्य रहाणेचं विशेष कौतुक केलं आहे. सौरव गांगुलीने ट्विटरच्या माध्यमातून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघावर स्तुतीसुमनं उधळली असून अजिंक्य रहाणेचा विशेष उल्लेख केला आहे. अजिंक्य रहाणेने सामन्यात केलेल्या शतकामुळे भारताच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.

विराटला पुरस्कार मिळाल्यानंतर रोहितने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

सौरव गांगुलीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मेलबर्न क्रिकेट मैदानावर विशेष विजय…भारताला या मैदानावर खेळायला आवडतं…वेल डन अजिंक्य रहाणे…चांगली लोकं नेहमी पहिल्या क्रमांकावर येतात..सर्वांचं अभिनंदन,,,जडेजा आणि अश्विन यांना पुढील दोन सामन्यांसाठी बीसीसीआयकडून ऑल द बेस्ट”.

मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय संघाने मिळवलेला हा चौथा विजय आहे. जो परदेशातील कोणत्याही क्रिकेट मैदानावर मिळवलेल्या विजयांमध्ये सर्वाधिक आहे. याआधी भारतीय संघाने क्वीन्स पार्क, त्रिनिदाद, सबीना पार्क, जमैका आणि कोलंबोच्या एसएससी मैदानावर तीन वेळा विजय नोंदवला आहे.

चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पहिल्याच डावात १९५ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवशी ८२ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी भारत १३१ धावांची आघाडीच घेऊ शकला. पण यानंतर पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

भारताने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाला २०० धावांमध्ये गारद केलं. भारतासमोर फक्त ७० धावांच लक्ष्य होतं. भारतीय संघाने आठ गडी राखून हा सामना जिंकला.

७ जानेवारीला तिसरा सामना
सध्या कसोटी मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया १-१ विजय मिळवत बरोबरीत आहे. ७ जानेवारीला तिसरा सामना सिडनीत खेळवला जाणार आहे. सिडनीमध्ये करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सामन्याची जागा बदलण्याची चर्चा होती. पण अखेर सिडनीतच सामना खेळवण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.