क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने बुधवारी BCCI चे अध्यक्षपद स्वीकारले. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे BCCI च्या अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे निश्चित झालं होतं. त्यानुसार आज सौरव गांगुलीने BCCI च्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.

अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच त्याने भारतीय कर्णधार विराट कोहली याच्याबाबत पहिली प्रतिक्रीया दिली. “मी विराटला उद्या भेटणार आहे. विराट कोहली संघाचा कर्णधार आहे. तो संघाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. विराट हा सध्या भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचा घटक आहे. मी नक्कीच विराटला पाठिंबा देणार. विराटला काय वाटतं? त्याचा प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? हे मी नक्कीच ऐकून घेईन. कारण मी स्वत: संघाचा कर्णधार होतो, त्यामुळे कर्णधाराच्या गरजा आणि कर्तव्य मला माहिती आहे. माझा विराटला पूर्ण पाठिंबा असेल,” असे सौरवने सांगितले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्याची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही आजच होणार आहे. गांगुलीसोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह याने BCCI च्या सचिवपदाचा आणि BCCI चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांनी BCCI च्या कोषाध्यक्षपदाचा पराभव स्वीकारला. त्यांचीही निवड बिनविरोध झाली.