रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशवर ८ गडी राखून मात केली. १५४ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत ६ चौकार आणि ६ षटकार लगावले. रोहितचा हा शंभरावा टी-२० सामना होता, याआधी भारताकडून कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाहीये.

महेंद्रसिंह धोनीने ९८ टी-२० सामने खेळले आहेत. मात्र २०१९ विश्वचषकानंतर धोनीला टी-२० संघात स्थान मिळेल की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान रोहितने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही रोहितचं कौतुक केलं आहे. रोहित भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू असल्याचं मत सौरवने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.

भारतीय महिला टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनेही १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. त्यामुळे शंभर आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारा रोहित दुसरा भारतीय ठरला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात बाजी मारत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे १० तारखेला नागपूरच्या मैदानावर होणाऱ्या अखेरच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.