माजी कर्णधार सौरव गांगुली याने बुधवारी BCCI चे अध्यक्षपद स्वीकारले. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे BCCI च्या अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे निश्चित झालं होतं. त्यानुसार आज सौरव गांगुलीने BCCI च्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.

पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांगुलीने अनेक विषयांवर भाष्य केले. त्यावेळी गांगुलीने एक खास ब्लेझर परिधान केल्याचं दिसून आलं. त्या ब्लेझरवर BCCI चा लोगो होता. त्यामुळे एका पत्रकाराने कुतूहलाने गांगुलीला त्या ब्लेझरबद्दल विचारले. त्याबाबत बोलताना गांगुलीने मजेशीर उत्तर दिलं. “मी भारतीय संघाचा कर्णधार असताना मला हे ब्लेझर मिळाले होते. म्हणून मी आज हे ब्लेझर पुन्हा परिधान करायचं ठरवलं. आज हे ब्लेझर मला थोडेसे ढिलं होत असलं, तरीही मी ते घातलं आहे”, असं गांगुलीने स्पष्ट केलं.

या पत्रकार परिषदेत गांगुलीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. “धोनीने आपल्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे बसाल आणि धोनीने केलेल्या विक्रमांची यादी पहाल, तेव्हा तुम्हीच म्हणाल की चॅम्पियन इतक्या लवकर संपत नाहीत. जोवर मी BCCI चा अध्यक्ष आहे, तोपर्यंत साऱ्यांचा योग्य मान राखला जाईल”, असे गांगुली म्हणाला.

तसेच, सौरव गांगुलीने विराटबद्दलही मत व्यक्त केले. “विराट कोहली संघाचा कर्णधार आहे. तो संघाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. विराट हा सध्या भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचा घटक आहे. मी नक्कीच विराटला पाठिंबा देणार. विराटला काय वाटतं? त्याचा प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? हे मी नक्कीच ऐकून घेईन. कारण मी स्वत: संघाचा कर्णधार होतो, त्यामुळे कर्णधाराच्या गरजा आणि कर्तव्य मला माहिती आहे. माझा विराटला पूर्ण पाठिंबा असेल”, असे सौरव गांगुलीने नमूद केले.