करोनामुळे सध्या संपूर्ण भारत देशच एकप्रकारे बंद पडल्याने इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १३वे पर्व कधी खेळवण्यात येईल, या प्रश्नाचे तुमच्याप्रमाणेच माझ्याकडेही उत्तर नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केली.

नियोजित वेळापत्रकानुसार २९ मार्चपासून ‘आयपीएल’ला सुरुवात होणार होती. परंतु विदेशी खेळाडूंची अनुपलब्धता आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आयपीएल’ १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर ढकलण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांतही करोनाचा संसर्ग कमी न झाल्याने ‘आयपीएल’ रद्द होण्याचीच शक्यता बळावली आहे.

‘‘सध्या मी ‘आयपीएल’विषयी काहीही बोलू शकत नाही. किंबहुना तुमच्याप्रमाणेच माझ्याकडेही ‘आयपीएल’ होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर अद्याप नाही. गेल्या १० दिवसांत काहीही सुधारणा झालेली नसल्याने प्रतीक्षा करण्याव्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही,’’ असे गांगुली म्हणाला.

एप्रिलमध्येही ‘आयपीएल’ शक्य न झाल्यास किमान तीन-चार महिन्यांनी स्पर्धेचे आयोजन करता येईल का याबाबत विचारले असता गांगुलीने नकार दर्शवला.

‘‘कोणत्याही कारणास्तव एखादी स्पर्धा तुम्ही सातत्याने लांबणीवर ढकलू शकत नाही. अशा वेळी ती स्पर्धा रद्द करून थेट पुढील वर्षी खेळवणेच योग्य ठरते. त्यामुळे तीन किंवा चार महिन्यांनी ‘आयपीएल’च्या आयोजनाचा विचार आम्ही तूर्तास केलेला नाही. ‘आयपीएल’मुळे जगभरातील अन्य क्रिकेट स्पर्धावर परिणाम झाल्याचे मला आवडणार नाही,’’ असे गांगुलीने सांगितले.

‘आयपीएल’च्या संघमालकांसोबतची बैठक रद्द

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढती १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी सध्याची परिस्थिती पाहता ‘आयपीएल’ रद्द करावी लागण्याचीच शक्यता आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) ‘आयपीएल’च्या संघमालकांसोबत ‘व्हिडीयो कॉन्फरन्सिंग’द्वारे होणारी बैठकही रद्द करण्यात आली.

ही बैठक स्थगित झाल्याने आयपीएल रद्द करण्यात येण्याची शक्यता वाढली आहे. जर ऑलिम्पिकसारखी क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात येऊ शकते तर ‘आयपीएल’बाबत हा निर्णय सहज होऊ शकतो, असेही ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. सध्याच्या स्थितीत ‘आयपीएल’चा प्रत्येक संघमालक त्यांचे नुकसान कमी कसे होईल, यादृष्टीने इन्शुरन्स कंपन्यांशी चर्चा करत आहेत.

‘आयपीएल’मधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे संघमालक नेस वाडिया यांनी खेळाडूंचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ‘‘माणुसकी ही पहिली आहे. सध्याच्या स्थितीत आयपीएलबाबत बोलणेही योग्य ठरणार नाही. संपूर्ण देशात टाळेबंदी आहे. आयपीएलपेक्षा करोनाला सामोरे जाण्याचे सध्या आव्हान आहे,’’ असे वाडिया यांनी सांगितले.