ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेचा अखेरचा सामना रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मुंबईतल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाने राजकोटमध्ये दमदार पुनरागमन केलं. मात्र या मालिकेत भारतीय खेळाडूंना होणाऱ्या दुखापती काही केल्या संघाची पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीयेत.

अवश्य वाचा – Ind vs Aus : बंगळुरुत लागणार मालिकेचा निकाल, जाणून घ्या आकडे काय सांगतात..

पहिल्या सामन्यात फलंदाजीदरम्यान यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हेल्मेटला पॅट कमिन्सचा चेंडू लागला होता. ज्यामुळे पंतला दुसऱ्या सामन्यातलं आपलं स्थान गमवावं लागलं होतं. यानंतर दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा दोघेही दुखापतग्रस्त झाले. शिखर धवनच्या बरगड्यांना दुखापत झाली असून, रोहित शर्माच्या खांद्याला क्षेत्ररक्षणादरम्यान इजा झाली आहे. BCCI ने दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

“शिखर आणि रोहित दुखापतीमधून सावरत आहेत. वैद्यकीय टीम त्यांच्यासोबत आहे. मात्र अंतिम सामन्यात ते खेळतील की नाही याबद्दलचा निर्णय सामन्याआधीच घेतला जाईल”, BCCI ने दिलेल्या या माहितीमुळे भारतीय संघाच्या गोटात अद्यापही चिंतेचं वातावरण कायम आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात हे दोन्ही खेळाडू खेळतात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.