आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एन. श्रीनिवासन यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले.
आयपीएलशी निगडित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकल्याप्रकरणी श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापासून रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे बीसीसीआयने आयसीसी अध्यक्षपदासाठी श्रीनिवासन यांच्या नावाच्या प्रस्तावालाच पसंती दिली आहे. या समीकरणांमुळे नव्याने संरचना करण्यात आलेल्या आयसीसी कार्यकारी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून श्रीनिवासन २९ जूनला मेलबर्नमध्ये पदभार स्वीकारणार आहेत. २३ तारखेपासून आयसीसीची वार्षिक परिषद सुरू होत आहे. या परिषदेअखेरीस श्रीनिवासन प्रमुखपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.