भारतीय संघाच्या ट्वेन्टी-२० जर्सीची रचना आणि निर्मित्ती यासाठी आलेल्या खर्चाची नुकसानभरपाई देण्याची नाईके कंपनीची विनंती बीसीसीआयने फेटाळली आहे. ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ही विशेष जर्सी तयार करण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे भारतीय संघाने स्पर्धेदरम्यान ही जर्सी परिधान केली नाही. मुंबईत नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.
 नाईकेने यासंदर्भात बीसीसीआयकडे नुकसानभरपाईची मागणी केल्याच्या वृत्ताला बोर्डाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. भारतीय संघाच्या पोशाखाचे प्रायोजक असलेल्या नाईकेने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी खास जर्सीची रचना केली होती मात्र या पोशाखात तिरंग्याला डाव्या खांद्यावर देण्यात आलेले स्थान आक्षेपार्ह होते. यामुळे भारतीय संघाने ही जर्सी न वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळे खेळाडूंनी २०११ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला पोशाखच वापरला.
जर्सी नीट बघितली तर जर्सीचा डाव भाग तिरंग्याने लपेटलेला होता. याव्यतिरिक्त ज्या पद्धतीने बीसीसीआयच्या लोगोला स्थान देण्यात आले तेही आक्षेपार्ह होते. बीसीसीआयच्या लोगोपेक्षा ते चिन्ह अशोक चक्रच वाटत होते. यामुळे बीसीसीआयने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नवीन जर्सीचा विचार रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.
ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि इरफान पठाण या खेळाडूंनी या जर्सीचे अनावरण केले.
विशेष म्हणजे, जेव्हा भारतीय संघाची जर्सी परिधान करतो, त्यावेळी सर्वोत्तम प्रदर्शन देण्याची मला प्रेरणा मिळते. देशाचा तिरंगा माझ्या हदयाच्या जवळ असण्याची कल्पना अनोखी आहे. माझ्यासारख्या सच्च्या हदयाने खेळणाऱ्या खेळाडूसाठी हे अधिकच सुखावणारे असल्याची भावना सेहवागने जर्सी अनावरण प्रसंगी व्यक्त केली होती.
नाईकीने बीसीसीआयकडे केलेल्या नुकसानभरपाईच्या मागणीत रकमेचा उल्लेख नाही. नाईकेने कुठल्याही रकमेची मागणी केलेली नाही. दरम्यान याविषयी नाईकीच्या ब्रँण्ड मार्केटिंगचे रेमुस डिक्रुझ प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.