परवानगीशिवाय पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी

लंडन : लंडनमध्ये गेल्या आठवडय़ात पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावणारे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली आहे.

शास्त्री यांना करोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वी सिद्ध झाले आहे. याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या चाचणीचे अहवालसुद्धा सकारात्मक आले आहेत, तर त्यांच्या संपर्कातील नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोहलीची चाचणी मात्र नकारात्मक आली आहे. शास्त्री यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला कोहलीसह या मार्गदर्शकांनी उपस्थिती राखली होती.

मँचेस्टरला शुक्रवारपासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीला प्रारंभ होणार असून, या मार्गदर्शक चमूला मात्र तिथे जाता येणार नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, परवानगी न घेताच कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल ‘बीसीसीआय’ने शास्त्री आणि कोहली यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाची छायाचित्रेसुद्धा ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांकडे आहेत. अखेरची कसोटी नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार व्हावी, यासाठी ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या संपर्कात आहेत. ‘आयसीसी’ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा संपल्यानंतर इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी सुरू होण्यास अवधी असताना ऋषभ पंतला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी भारतीय संघातील खेळाडूंना सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी न लावण्याचे निर्देश दिले होते.