भारतीय संघाच्या फलंदाजीच्या प्रशिक्षकपदावरून अपेक्षेप्रमाणेच संजय बांगर यांची हकालपट्टी करण्यात आली असून, ही जबाबदारी माजी सलामीवीर विक्रम राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भरत अरुण आणि आर. श्रीधर यांनी अनुक्रमे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षकपद टिकवण्यात यश मिळवले आहे.

एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने साहाय्यक प्रशिक्षकपदाच्या प्रत्येक जागेसाठी गुणानुक्रमे तीन जणांच्या नावांची शिफारस केली. हितसंबंधांची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जागेसाठीच्या अव्वल स्थानावरील उमेदवाराच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

५० वर्षीय राठोड १९९६मध्ये सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे प्रभावी न ठरलेल्या राठोड यांनी पंजाबसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या. २०१६मध्ये संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीचे ते सदस्य होते.

राठोड यांनी आधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे फलंदाजीचे सल्लागार आणि युवा (१९ वर्षांखालील) संघाच्या फलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. परंतु राठोड यांचे बंधू आशीष कपूर १९ वर्षांखालील निवड समितीचा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती.

‘‘विक्रम राठोड यांच्याकडे फलंदाजांना मार्गदर्शनाचा उत्तम अनुभव आहे. निवड समितीच्या शिफारशीनुसार त्यांच्याकडे फलंदाजीचे प्रशिक्षकपद सोपवण्यात येणार आहे. या पदासाठी सध्याचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांना दुसरे आणि इंग्लंडचे माजी फलंदाज मार्क रामप्रकाश यांना तिसरे स्थान मिळाले,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सांगितले. मुंबई इंडियन्सचे माजी फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांचे पुनरागमन झाले आहे. ते २०११मध्ये भारताच्या संघाच्या साहाय्यक चमूत होते.

८७ जणांच्या मुलाखती

सोमवारपासून साहाय्यक प्रशिक्षकपदासाठी मुलाखत प्रक्रियेला प्रारंभ झाला. राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांनी एकूण ८७ जणांच्या मुलाखती घेऊन गुरुवारी पाच पदांसाठी उमेदवार निश्चित केले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदासाठी अनुक्रमे १४, १२ आणि ९ जणांच्या मुलाखती झाल्या. याशिवाय फिजिओथेरपिस्ट पदासाठी १६, सराव प्रशिक्षक पदासाठी १२ आणि प्रशासकीय व्यवस्थापक पदासाठी २४ जणांच्या मुलाखती झाल्या. निवड समितीने सराव प्रशिक्षक पदासाठीच्या प्रात्यक्षिक कौशल्याच्या दुसऱ्या फेरीसाठी ल्यूक वूडहाऊस, ग्रँट लुडेन, रजनिकांत सिवागनानम, निक वेब आणि आनंद दाते यांची निवड केली आहे.

सुब्रह्मण्यम यांच्या जागी डोंगरे

सध्या चालू असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सुनील सुब्रह्मण्यम यांना प्रशासकीय व्यवस्थापक पद टिकवण्यात अपयश आले आहे. त्यांच्या जागी गिरीश डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्यामुळे सुब्रह्मण्यम यांना मायदेशी परत पाठवण्याचा आदेश ‘बीसीसीआय’ने काढला होता. मात्र सुब्रह्मण्यम यांनी दिलगिरी प्रकट केल्यानंतर त्यांना वेस्ट इंडिजमध्ये थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

असा असतील भारतीय संघाचे प्रशिक्षक –

मुख्य प्रशिक्षक – रवी शास्त्री

फलंदाजी प्रशिक्षक – विक्रम राठोड

गोलंदाजी प्रशिक्षक – भारत अरुण

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक – आर.श्रीधर

संघाचे माजी फिजीओथेरपिस्ट पॅट्रीक फरहात यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीन पटेल यांना त्यांच्या जागी संधी देण्यात आली आहे, तर गिरीश डोंगरे हे संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान भारताचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी १९९६ साली भारताकडून ७ वन-डे आणि ६ कसोटी सामने खेळले आहेत.